देवमाकडाच्या मृत्यूनंतर 51 ग्रामस्थांनी केले मुंडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । धुळे

डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार माणसाची उत्पत्ती वानरापासून झाली आहे. वानर आपले पूर्वज आहेत. या मतावर अनेक जण ठाम आहेत. पूर्वज असलेल्या वानराशी नातेसंबंध दृढ करतांनाच धुळे तालुक्यातील सहा गावांमधील सुमारे 51 ग्रामस्थांनी मुंडन केले. कारण, या गावांच्या परिसरात गेल्या काही वर्षापासून देव माकड म्हणून परिचित असलेल्या वानराचा वावर होता. वयोमानानुसार या वानराचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याचा दशक्रिया विधी करताना ग्रामस्थांनी मुंडन केले. त्यानंतर चौथरा उभारून त्यावर वानराची मूर्ती स्थापन केली. देव वानराचे हे स्थान आता ग्रामस्थांचे श्रध्दास्थान होणार आहे.

हिंदुस्थानात श्रध्दाळू लोक खुप आहेत. त्यातच वानरापासून आपली उत्पत्ती झाल्याचे मान्य झाल्यामुळे वानराबाबत मनुष्य जास्त संवेदनशील आहे. वानर म्हणजे हनुमानाचे प्रतिरूप असे देखील मानले जाते. धुळे तालुक्यातील निकुंभे, वडेल, रामनगर, तिसगाव, ढंडाणे, हनुमंतवाडी या गावांच्या परिसरात डोंगराळ भाग आहे. या भागात अनेक पशुपक्षी आहेत. पण, गेल्या काही महिन्यांपासून या गावांमध्ये एका वानराचा वावर होता. कुणाचाही आणि कुठलाही कार्यक्रम असेल तरी या वानराने हजेरी लावलीच पाहिजे असा त्याचा दंडक होता. त्यामुळे साहजिकच ग्रामस्थांनी या वानराला देव माकड असे नाव दिले. कुणालाही उपद्रव न देणारे हे वानर कार्यक्रम संपल्यानंतर माघारी जात असे. गावांच्या डोंगरांवर ते राहत असे. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासुन कुठल्याच गावात देव माकड दृष्टीक्षेपात आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा रामनगरच्या डोंगराळ भागात देव माकड मृत अवस्थेत दिसले.

सर्व गावांना देवमाकडाच्या मृत्यूची बातमी पोहोचविण्यात आली. देवमाकडावर श्रध्दा असणाऱ्या नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करुन देवमाकडावर अंत्यसंस्कार केले. दशक्रिया विधी करतांना 51 जणांनी मुंडण देखील केले. त्यानंतर दुखवटा व्यक्त करीत अन्नदान देखील करण्यात आले. देवमाकडाचे मंदिर उभारले जावे असा प्रस्ताव काहींनी मांडला. पण, जमा झालेल्या लोकवर्गणीतून एक चौथरा उभारण्यात आला आणि मध्यभागी माकडाची मूर्ती बसविण्यात आली. माकडाच्या या मूर्तीसमोर शुक्रवारी सर्व जण नतमस्तक झाले. या परिसराचा दुष्काळ हटावा. भरपूर पाउस व्हावा म्हणून देव माकडाच्या मूर्तीसमोर प्रार्थना करण्यात आली