
सांगली जिह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडून विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा खुर्चीवर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त गॅझेटची प्रतीक्षा बाकी आहे. येत्या काही दिवसांत उपनगराध्यक्षपद आणि सभापतिपदांच्या निवडी होतील, त्यासाठी इच्छुक नगरसेवकांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे नगरपालिकांमध्ये पुन्हा राजकीय हालचाली वाढल्या असल्याचे चित्र आहे.
सांगली जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, विटा, तासगाव, पलूस आणि जत नगरपालिका आणि शिराळा व आटपाडी नगरपंचायत मतदानाचा 21 डिसेंबरला निकाल लागला. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला संमिश्र यश मिळाले. जत नगरपालिका आणि आटपाडी नगरपंचायतमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. विटा पालिका व शिराळा नगरपंचायतीत शिंदे गटाचे नगराध्यक्ष झाले आहेत. इस्लामपूर आणि आष्टा नगरपालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला यश मिळाले. पलूस नगरपालिकेत काँग्रेस सत्तेवर आली. आमदार डॉ. विश्वजीत कदम पलूस नगरपालिकेची सत्ता मिळविण्यात यशस्वी झाले. तासगाव नगरपालिकेत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला यश आले.
आटपाडी नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष झाले असले तरी शिंदे गटाचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. शिराळा नगरपंचायतीत नगराध्यक्ष शिंदे गटाचा झाला असला तरी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. या दोन्ही ठिकाणची राजकीय बलाबलची स्थिती लक्षात घेता उपनगराध्यक्षपद आणि सभापतिपदे मिळविताना बरीच ओढाताण होणार, असे दिसत आहे. महायुतीचा राजकीय मैत्रीपर्व दोघांनीही निभावला, तर अडचण नाही, मात्र तसे न झाल्यास येथे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
ईश्वरपूर आणि आष्टा पालिकेत नगराध्यक्षपद राष्ट्रवादीने मिळविले असले तरी, उपाध्यक्षपद आणि सभापतिपदे त्यांच्याच वाटय़ाला जाणार आहेत. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे उपाध्यक्षपद किंवा सभापतिपदांसाठी अन्य पक्षांची मनधरणी करण्याची वेळ येणार नाही. विटा नगरपालिकेत सर्वाधिक जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षासह सभापती निवडीत शिंदे गटाचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट दिसते.
पलूस नगरपालिकेत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. अजित पवार गटाला चार आणि भाजपला केवळ एकमेव जागा मिळाली. त्यामुळे या ठिकाणी पदाधिकाऱयांची पदे काँग्रेसच्या वाटय़ाला येणार आहेत. जतमध्ये भाजपच्या नगराध्यक्षासह अकरा नगरसेवक निवडून आले आहेत, तर काँग्रेसला सात आणि अजित पवार राष्ट्रवादीला चार नगरसेवक आहेत. या ठिकाणी भाजपचेच पारडे जड आहे. तासगाव नगरपालिकेत माजी खासदार संजयकाका पाटील यांचे वर्चस्व राहिले असून, तेथे पदाधिकारी निवडताना अडचणी येण्याची शक्यता कमीच आहे.
पदांसाठी नेते मंडळींची मनधरणी सुरू
उपनगराध्यक्षासह सभापतिपदाच्या निवडी येत्या काही दिवसांत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपालिका कार्यक्षेत्रात राजकीय हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. सभापतीपद पदरात पाडून घेण्यासाठी स्थानिक नेत्यांकडे मनधरणी करून आपल्याला पदे मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेतेमंडळी उपनगराध्यक्ष आणि सभापतिपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

























































