
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनवर जास्त खर्च होतो म्हणत सर्वच खात्यातील कर्मचारी कमी करण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाचा हा छुपा अजेंडा आहे. त्यावर तात्पुरती व्यवस्था म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मोटर लोडर व परिवहन या कामाचेही कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे. या विरोधात मंगळवार, दुपारी 2 वाजता आझाद मैदानात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने पहिल्यांदा पालिका रुग्णालयात सरकारी आणि खासगी भागीदारी पद्धत सुरू करून रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता त्याच्या पुढील टप्प्यात घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत असून साफसफाई खात्याचे कचरा संकलन म्हणजे मोटर लोडर व परिवहन या कामाचे खासगीकरण करण्याचा डाव पालिका प्रशासनाने आखला आहे.
पालिका प्रशासनाच्या या मनमानी धोरणाला आणि खासगीकरणाला विरोध करण्यासाठी पालिका कर्मचारी मंगळवारी आझाद मैदानात महामोर्चा काढणार आहेत. या महामोर्चात सर्व खात्यातील कर्मचारी कामगारांनी सहभागी होऊन खासगीकरणाविरोधातील लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी केले आहे.