पालिकेच्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांत शिक्षिकांची बाजी! 50 पैकी 31 पुरस्कार शिक्षिकांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱया आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांत यावर्षी शिक्षिकांनी बाजी मारली आहे. एकूण 50 पैकी 31 पुरस्कार शिक्षिकांनी पटकावले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. दहा हजार रुपये आणि पदक, शाल, श्रीफळ देऊन या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधापृष्णन यांच्या 5 सप्टेंबर रोजी असलेल्या जन्मदिवसानिमित्त त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. शिक्षण विभागातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित आणि विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी 1971 पासून हे पुरस्कार दिले जात आहेत. या पुरस्कारांच्या घोषणेप्रसंगी सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उप शिक्षण अधिकारी आशा मोरे आदी उपस्थित होते.

130 शिक्षकांमधून झाली निवड

आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांसाठी एकूण 130 शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड समितीने शिक्षकांची निवड केली. यामध्ये दहा वर्षे निष्कलंक सेवा, विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी केलेले कार्य, विद्यार्थ्यांसाठी केलेले लिखाण, उल्लेखनीय कार्य, शैक्षणिक प्रकल्पात घेतलेला सहभाग, मिळालेले पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात केलेले वैशिष्टय़पूर्ण काम असे निकष डोळ्यांसमोर ठेवून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराती, कन्नड माध्यमांच्या शाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे.