मुरबाडजवळ दोन बसची भीषण टक्कर, माजी आमदारासह 21 प्रवासी जखमी

878

मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील खरबेची वाडीजवळ गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खासगी बस व एसटीची समोरासमोर भीषण टक्कर झाली. अपघातात दोन्ही बसमधील 21 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात घडला असतानाच पाठीमागून येत असलेले माजी आमदार दिगंबर विषय यांची गाडी अपघातग्रस्त एसटीवर आदळली. त्यात विषय गंभीर जखमी झाले असून त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. मुरबाड आगरातून 7,45 वाजता गोरखगड बस खरबेची वाडीजवळ येत असताना शिर्डीहून उल्हासनगरला जाणारी खासगी बस यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. तेवढय़ात टोकावडे गावाहून मुरबाडला येत असताना माजी आमदार यांच्या गाडी मागून या गाडय़ांवर येऊन आदळली. या तिहेरी अपघातात विषय यांच्यासह 21 प्रवासी जखमी झाले. या सर्वांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या