कायदा मोडला पण ‘बाप’ जिंकला; पॅरोलवर सुटून फरार झाले अन् मुलींना शिकवले, 12 वर्षांनी आत्मसमर्पण केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाप आपल्या पोराबाळांसाठी काहीही करू शकतो. याचाच प्रत्यय नागपूरमध्ये आला आहे. येथे संजय तेजणे (वय – 50) नावाचा आरोपी 12 वर्षांपूर्वी पॅरोलवर असताना फरार झाला होता. जुळ्या मुलींना शिकवण्याचा ध्यास घेऊन फरार झालेल्या बापाने तब्बल एक तप स्वत:ला पोलिसांपासून लपवून ठेवले आणि मुलींचे शिक्षण केले. मुली दहावी पास होताच आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

संजय तेजणे याला वडील शाकिलराम, भाऊ वासुदेव आणि नामदेव या चौघांना हत्येच्या आरोपाखाली नोव्हेंबर 2003 मध्ये अटक करण्यात आली होती.2005 मध्ये चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यादरम्यान संजय पत्नी कल्पना आणि आईला भेटण्यासाठी अनेकदा तुरुंगाबाहेर आला. 2007 मध्ये त्याला दोन जुळ्या मुलीही झाल्या.

मुलींचा जन्म झाल्यानंतर त्याने न्यायालयाकडे आपली शिक्षा रद्द करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी फेटाळण्यात आली. त्याने त्याने मुली मोठ्या होईपर्यंत पॅरोल घेऊन फरार होण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर संजय फरार झाला आणि मुलींच्या शिक्षणासाठी एका प्रिटिंग युनिटमध्ये लपून काम करू लागला.

संजयला श्रद्धा आणि श्रृती नावाच्या दोन मुली आहेत. नागपूर जिल्ह्यातील चिकना जवळील हुडकेश्वर खुर्द गावातील संताजी शाळेमध्ये दोघी शिक्षण घेत होत्या. नुकत्यात झालेल्या दहावीच्या महाराष्ट्र बोर्ड परीक्षेमध्ये दोघींना अनुक्रमे 86 आणि 83 टक्के मार्क मिळाले. मुली पास झाल्यानंतर 12 मे रोजी संजयने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. गुरुवारी या दोघींचा नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये एनजीओ आणि कारागृह विभागातर्फे सन्मान करण्यात आला.

मुलींना व्हायचंय आयएएस अधिकारी

वडिल आम्हाला गुपचूप भेटायचे आणि आम्हाला पुस्तके आणायचे. परीक्षा सुरू असतानाही परीक्षा केंद्रीवर ते आमच्यासोबत असायचे. ते आमचे प्रेरणास्थान असून आम्हाला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. नंतर आयएएस अधिकारी बनून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, असे श्रद्धा म्हणाली.