कुटुंबीयांसमोर कोयत्याने वार करून दोन्ही हात तोडले, अकोळनेरमध्ये निर्घृण खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर तालुक्यातील अकोळनेर येथे अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर त्याच्या घरात कुटुंबीयांसमोरच कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या खळबळजनक घटनेमुळे अकोळनेर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. वेळ प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

दिनेश गोरख दिवटे (30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेश हा बुधवारी रात्री अकोळनेर-नगर रस्त्यालगत असलेल्या घरात कुटुंबीयांसमवेत गप्पा मारत बसला होता. याचवेळी चेहऱ्याला रुमाल बांधून मोटारसायकलवर आलेल्या चार हल्लेखोरांनी दिनेशवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दिनेशचा अति रक्तस्त्राव होऊन दिनेश जागीच मृत्यू झाला. हा हल्ला सुरू असताना दिनेशची आई, पत्नी, 3 बहिणी घरातच होत्या.

एका हल्लेखोराने दिनेशच्या कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे डोळ्यासमोर होत असलेली ही भयानक घटना हताशपणे पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. हल्लेखोरांनी दिनेश वर सपासप वार करून त्याचे दोन्ही हात मनगटा पासून तोडले. डोक्यावरही अनेक वार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह घरातून ओढत घरापाठीमागील शेतात टाकला. त्यानंतर घरातील महिलांना एका खोलीत कोंडून घेत हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

दरम्यान, ही घटना समजताच ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली़. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करत घटनेची नोंद केली. मयत दिनेशची पत्नी हर्षदा हिच्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोळनेरला पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी
या घटनेनंतर गुरुवारी सकाळी अकोळनेर ग्रामस्थ दिवटे वस्तीवर जमा झाले. तेथे आलेल्या अप्पर पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक अनुराग जैन, स.पो.नि.शरद गोर्डे, उपनिरीक्षक एस.डी. पालवे यांच्यासमोर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. हल्लेखोरांचा तात्काळ तपास न लावल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

ahmednagar-police