मध्य प्रदेशातील हरदा गावातल्या एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. हत्या करण्याकरिता तिने गुगलची मदत घेतल्याचे उघडकीस आले आहे.
हरदा गावात राहणारा आमिर खान (42) याची हत्या 17 जूनला रात्री त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून केली. लॉकडाऊनमुळे आमिर दिवसभर घरी असल्यामुळे आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकरामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे या दोघांनी मिळून नवऱ्याची हत्या करण्याचे षड्यंत्र रचले. नवऱ्याची हत्या करण्यासाठी दोघे जण बरेच दिवस संधीची वाट पाहात होते. अखेर एक दिवस प्रियकराची मदत घेऊन बायकोने नवऱ्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाबाबत आरोपी पत्नीची चौकशी केली असता त्यांना पत्नीचाच संशय आला. म्हणून त्यांनी तिचा मोबाईल तपासला तेव्हा तिने कॉल लॉगमधील काही मोबाईल नंबर डिलिट केले आहेत हे पोलिसांच्या लक्षात आले, तसेच प्रियकर आणि तिच्यात होणाऱ्या संवादाचे रेकॉर्डिंगही तिने डिलिट केले होते. शिवाय पोलिसांना तिच्या नवऱ्याच्या अंगावर काही जखमाही दिसल्या, मात्र पत्नीने याबाबत काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता आरोपी पत्नीने नवऱ्याची हत्या करण्यासाठी गुगलची मदत घेतली असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पत्नीच्या मोबाईलमधील गुगल सर्च हिस्ट्रि तपासली. तेव्हा त्या हिस्ट्रीत आरोपी महिलेने एखाद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचे हात कसे बांधावेत हे शोधले असल्याचे पोलिसांना आढळले.
पोलिसांनी माहिती दिली की, महिलेचा प्रियकर आरोपी इरफान खान (37) हा नवी आबादी नगरपालिका परिषदेत सहायक महसूल निरीक्षक आहे. तबस्सुम खान आणि त्याचे बऱ्याच वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. या हत्येप्रकरणी आरोपी पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली पिवळ्या रंगाची हातोडी, हत्या करताना आरोपींनी वापरलेले कपडे आणि गुगल सर्च करण्यासाठी वापरलेले मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
























































