
टीम इंडियाचा माजी सलामीवीर मुरली विजयने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्याने आपण निवृत्त होत असल्याचे सांगितले. आता आपण परदेशी लीगमध्ये नशीब आजमावणार असल्याचे मुरलीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुरली विजयने टीम इंडियाकडून डिसेंबर 2018मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. विजयने 61 कसोटीत 3982 धावा, 17 एकदिवसीय सामन्यात 339 धावा आणि 9 टी-20 सामन्यांत 169 धावा केल्या आहेत. तर कसोटी सामन्यात 12 शतके झळकाविली आहेत. त्याने कसोटीत 15 अर्धशतकेही झळकाविली आहेत. मात्र वनडे आणि टी-20मध्ये मुरलीला कसोटीसारखे यश मिळवता आले नाही. 2002 ते 2008 हा क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. या काळात मी देशासाठी योगदान दिले. मी बीसीसीआय, तामीळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्जचे आभार मानतो, असे मुरलीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.


























































