
रानडुकराच्या शिकारीसाठी पेरलेला बॉम्ब एका बैलाच्या जीवावर उठला. रानात चरायला गेलेल्या बैलाने चाऱ्यासह बॉम्ब खाल्ल्याने मोठा स्फोट झाला आणि त्याचा जबडा अक्षरशः फाटला. मुरुडच्या वावडुंगीत ही घटना घडली. या अपघातामुळे बैलाच्या जबड्याच्या चिंधड्या उडाल्याने जनावरे चरायला सोडावीत की नाही, अशी चिंता शेतकरी आणि पशुपालकांमध्ये व्यक्त होत आहे.
मुरुड तालुक्यातील वावडुंगी वरचीवाडी येथील शेतकरी मधुकर भुवड यांच्या मालकीचा बैल रानात चरायला गेला होता. चरताना चाऱ्यासोबत तोंडात बॉम्ब आल्याने त्याचा स्फोट झाला आणि बैलाचा जबडा फाटून तो गंभीर जखमी झाला. शेतीच्या मोसमात आपल्या बैलाची अशी अवस्था बघून मधुकर भुवड यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.
बॉम्ब बनवणाऱ्यांचा शोध घ्या
काही समाजकंटक रानडुक्कर, सशांची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब तयार करून ते रानात पेरून ठेवतात. अशाच एका समाजकंटकाने पेरून ठेवलेल्या बॉम्बने एक बैल कायमस्वरूपी निकामी झाला आहे. बॉम्ब बनवणाऱ्या या समाजकंटकांचा शोध घ्या अशी मागणी वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार यांनी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे, मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्याकडे केली आहे.




























































