मसुरेवासीयांची दिवाळी सूरमयी, संगीत मैफीलीचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

“सारेगम”वाद्यवृंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात भक्ती गीते, नाट्यसंगीत, बंदिश अशा विविध गीतानी मसुरेवासीयांची दिवाळी सुरमयी बनविली.

गेली सलग अकरा वर्षे या वाद्यवृंदा कडुन “दिवाळी पहाट” कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंगळवारी मसुरे मर्डेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे या कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवंदनेने झाला. यानंतर “गणाधीशा हो उठा लवकरी” या भुपाळीने सौ.प्राजक्ता पेडणेकर यांनी संगीत मैफीलीस प्रारंभ केला. भुपाळीचे स्वर वातावरणात दरवळत असतानाच अनंत येसजी यांनी “गजवदना मनसुमना” हे गणेश भक्तीगीत सादर केले. यानंतर बाळु दळवी यांनी “संत भार पंढरीत”,तर बाबु मुळीक यांनी “चालतील सदगुरु स्वामी” या गीतातुन अक्कलकोट भेटीची अनुभुती दिली. यानंतर पंढरीनाथ मसुरकर यांनी ” पाउले चालती पंढरीची वाट” तर झुंजार पेडणेकर यांनी “विठ्ठल आवडी प्रेम भाव” हे सुरेश वाडकर यांनी अजरामर केलेले भक्तीगीत सादर केले. यानंतर” नवल वर्तलेगे माये “,”विठ्ठलाचे पायी विट “,”नमन माझे श्री गुरुराया”,यती मन मम मानीत त्या एकला नृपाला” अशा गीतानी उत्तरार्ध रंगत गेला.

कार्यक्रमाची सांगता बाबु मुळीक यानी “शिणले तनमन वाट पाहुनी”या भैरवीने केली. कार्यक्रमासाठी संगीतसाथ हार्मोनियम बाबु मुळीक, तबला सुनिल प्रभुगावकर, पखवाज लौकीक भोगले तर कोरस शैलेश मसुरकर, वैष्णवी दळवी यानी तर ध्वनी संयोजन वेरली येथील मेस्री बंधु यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ट्रस्टचे अजय प्रभुगावकर, बाबु पारकर, राजु सावंत, गजानन पारकर, दिनु नाचणकर,यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.