
हिंदुस्थानात मुसलमानांची संख्या आता 16 कोटींपर्यंत पोहोचली आहे. असं असलं तरी इतर अल्पसंख्यकांच्या तुलनेत मुसलमानांनाच या देशात असुरक्षितता का वाटते असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांनी विचारला आहे. इतर अल्पसंख्यकांची संख्या मुसलमानांपेक्षा कितीतरी कमी आहे तरीही त्यांना या देशात सुरक्षितता वाटते असं कृष्ण गोपाळ म्हणाले आहेत.
औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोव्ह याच्यावर आधारीत एका परिषदेत कृष्ण गोपाळ बोलत होते. त्याने उपनिषदे पर्शियन भाषेत भाषांतरीत केली होती असं कृष्ण गोपाळ यांनी म्हटले आहे. दारा शुकोव्ह हा उदारमतवादी होता. त्याच्या या गुणधर्माबाबत बोलताना कृष्ण गोपाळ म्हणाले की या देशाची ओळख सर्वसमावेशक आणि एकसंध म्हणून संपूर्ण जगाला फार पूर्वीपासून आहे. मुस्लिम विचारवंत रामिश सिद्दीकी यांनी मुसलमानांना घाबरण्याची गरज काय? असा त्यांच्या लेखातून प्रश्न विचारला होता. या लेखाचा हवाला देताना म्हटले की कृष्ण गोपाळ यांनी म्हटले की त्यांचा हा सवाल अगदी बरोबर आहे ‘मुसलमानांची संख्या या देशात 16 कोटींपर्यंत पोहोचली असून असुरक्षिततेचा विचार त्यांच्या मनात कसा काय येऊ शकतो ? हा मोठा प्रश्न आहे.’
‘या देशात पारशांची संख्या फारतर 50 हजार असेल, जैनांची संख्या 45 लाख असेल, बौद्धांची संख्या जवळपास 80 लाख असेल, ‘ज्यू’ तर अवघे 5 हजार असतील. मात्र यातल्या कोणालाही या देशात भीती वाटत नाही मग देशात 16 कोटी मुसलमानांना ही भीती का आणि कोणापासून वाटावी? असा प्रश्न कृष्ण गोपाळ यांनी विचारला आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी भाषणात म्हटले की औरंगजेब हा दहशतवादाचे प्रतीक होता. त्याने केलेल्या हिंसाचाराचे आणि दडपशाहीचे काही धर्मांध मुसलमानांनी, डाव्या पक्षांनी आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या इतिहासकारांनी उदात्तीकरण केल्याचा आरोप नक्वी यांनी केला.






























































