मुस्लिम विद्यार्थ्याला दहशतवादी म्हणून हिणवले, पीईएस विद्यापीठाचा प्राध्यापक निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लिम विद्यार्थ्याला भरवर्गात मुस्लिम म्हणून हिणवणाऱ्या बंगळुरूच्या एका प्राध्यापकाचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला होता.

मुरलीधर देशपांडे, असे या प्राध्यापकाचे नाव आहे. ते पीईएस विद्यापीठात कार्यरत आहेत. वर्ग सुरू असताना एका मुस्लिम विद्यार्थ्याने बाहेर जाण्याची परवानगी मागितली. त्यावर या प्राध्यापकाने विद्यार्थ्यावर संताप व्यक्त केला. तुला लाज वाटत नाही का?, मला वाटले होते आज मी खूप शांत राहीन, अशी आगपाखड करत देशपांडे यांनी या विद्यार्थ्याला दहशतवादी म्हणून हिणवले.

या घटनेचा एका विद्यार्थ्याने व्हिडिओ शूट केला. त्यात प्राध्यापक देशपांडे यांचे वाक्य स्पष्टपणे ऐकू येत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. काँग्रेस विद्यार्थी संघटनेने याप्रकरणी कारवाईची मागणी केली. याची गंभीर दखल घेत विद्यापीठाने चौकशीचे आदेश देत चौकशी पूर्ण होईपर्यंत देशपांडे यांचे निलंबन करण्यात आले आहे.