
सामना ऑनलाईन । रोम
इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांची तिसरी पिढी राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. कायो जुलिओ सीझर हे बेनिटो यांचे पणतू असून त्यांनी इटलीच्या संसदेसाठीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रदर्स ऑफ इटली’ नावाच्या कडवट उजवी विचारसरणी असलेल्या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या पक्षाकडून कायो निवडणूक लढवणार आहेत त्यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की ब्रदर्स ऑफ इटलीचे प्रजासत्ताक पद्धतीबाबतचे विचार, इटलीची आणि या देशात राहणाऱ्या कुटुंबाच्या सुरक्षेसंदर्भातील विचार त्यांना आवडले आहेत. कायो यांचे पणजोबा बेनिटो मुसोलिनी यांचा इटलीमध्ये आजही चाहतावर्ग बराच मोठा आहे.

इटलीला आधुनिक बनवण्यामध्ये बेनिटो यांचा मोठा वाटा होता असं आजही तिथल्या अनेकांना वाटतं. हिटलरसोबत आघाडी करून आणि वर्णद्वेषी धोरणे स्वीकारानू बेनिटो यांनी इटलीमधील असंख्य नागरिकांचा रोष ओढावून घेतला होता.

मुसोलिनी आडवान असल्याने कायो यांच्याकडे संपूर्ण इटलीचे लक्ष लागलेले आहे. मला माझ्या आडवानावरून नाही तर माझ्या कामावरून ओळखा असं आवाहन कायो यांनी केलं आहे. मुसोलिनी यांना इटलीमध्ये प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू झालं असून या आंदोलनामुळे त्यांचे फेसबुक पेज बंद करण्यात आले होते. कायो हे एकावन्न वर्षांचे असून ते निवृत्त नौसेना अधिकारी आहेत. त्यांनी इटालीच्या सर्वात मोठ्या संरक्षण कंत्राटदार फिनमेकेनिकामध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.
कायो हे मुसोलिनी घराण्यातील राजकारणात उतरणारी पहिली व्यक्ती नाहीये. मुसोलिनी यांनी नात राचेल या रोम नगरपरिषदेच्या सदस्या आहेत. राचेल यांची सावत्र बहीण अलेसांद्रा ही देखील राजकारणात असून तिचा अभिनेता जिम कॅरीसोबत झालेला वाद संपूर्ण जगाना पाहिला आहे. जिम कॅरी याने मुसोलिनी यांचे मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे व्यंगचित्र ट्विटरवर अपलोड केलं होतं. यावरून अलोसांद्राने जिम कॅरीला ट्विटरवरूनच सुनावलं होतं. यानंतर दोघांमध्ये ट्विटरवर जबरदस्त वाकयुद्ध पेटलं होतं.


























































