
खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीकिनारी असलेली मटण मार्केटची इमारत खचल्याचे निर्दशनास आल्याने या इमारतीतील व्यावसायिकांचा जीव टांगणीला लागला आहे. नगरपालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना केली नाही तर ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खेडमध्ये सध्या पावसाची संततधार सुरु असल्याने जगबुडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकिनारी असलेल्या मटण मार्केटच्या इमारतीचा काही भाग हा पावसाळ्यात जगबुडीच्या पाण्याखाली रहात असल्याने इमारतीचा पाया कमकुवत झालेला आहे.
येथील व्यावसायिकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी नगरपालिका प्रशासनाला इमारतीची डागडुजी करण्याबाबाबत विनंती केली होती. मात्र प्रशासनाकडून याची दखल न घेतल्याने या वर्षीच्या पावसात इमारतीचा काही भाग खचला आणि इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
या इमारतीत मटन व्यायसायिकांचे 17 गाळे असून या ठिकाणी मटण खरेदीसाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी होत असते. इमारतीच्या पायाचा भाग खचणे ही बाब गंभीर असून वेळीच उपाययोजना न केल्यास इमारत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नगरपालिका प्रशासनाने याची दाखल घेत वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.






























































