माझे सुहृद

अदिती सारंगधर,adsarangdhar@gmail.com

जीवलग सदराचे नायक, नायिका म्हणजे आपलं जगणं आनंददायी करणारे प्राणी-पक्षी… या सगळ्यांनी आपल्या आयुष्यात खऱया प्रेमाचा रंग भरला आहे…

कळायला लागलं तेव्हापासून ‘माऊ’ हे टोपणनाव मागं जोडलं गेलं. सो, कोणी माऊ आलीय (मांजर आलीय) म्हटलं तर मीच वाटायचे मला… कल्याणच्या घरात आमचा मोठ्ठा वाडा होता. मोठं अंगण होतं. अंगणात विहीर, कवठी चाफ्यापासून ते गुलबाक्षी, रातराणी, चमेलीपर्यंतची सगळी झाडं दारात. बाहेर छानशी पडवी, रस्त्यातून येणाऱया जाणाऱया सगळय़ा कुत्र्यांना आसरा म्हणून पाणी नेहमी ठेवलेलंच असायचं. आमच्या समोरच्यांच्या (हजारे)च्या घरात कुठलातरी एक मोठ्ठा कुत्रा होता. मग दुसरा मोठा कुत्रा आला, गेटवरून घाबरतच त्यांना बघायचो आणि आमच्याकडे बघून भुंकायला लागले की धूम ठोकायचो सुरुवातीला. मग हिंमत वाढली (कुत्रे बांधून ठेवलेले असायचे ना।) गेटमधून हळूहळू आत जायला लागले, मग कुत्र्याच्या बाजूला, मग हळूच हात चाटायला द्यायला लागले. डोक्यावरून हात फिरवायला लागले. नाव आठवत नाही पण नंतर कळलं ही काहीतरी डॉबरमॅन नावाची जात आहे. आणि दुसरा ग्रेट डेन. नंतर शाळेतून आलो की मित्रांना भेटायला जायचं (डॉग्जना) असाच दिनक्रम झाला. काही काळानं त्यातला एक गेला आणि दुसरा खूपच एकटा पडायला लागल्याने त्यांनी त्याला फार्म हाऊसवर हलवलं.

आयुष्यात पहिल्यांदा प्राण्याशी तुटलेल्या संवादाचं वाईट वाटलं होतं. खूप दिवस, खूप दिवस त्या वेळात काय करू कळत नव्हतं. मग अजून एक मित्र सापडला… पोपट. आमच्या अजून एका शेजाऱयानं पोपट आणला. घरी गेलो की ‘टवळी’ अशी हाक मारायचा मला. ‘श्री’ काकाच्या घरचा पोपट असं मी त्याला म्हणायची. गंमत अशी की घरी आल्यावर पण मला जे काही सांगायचं असायचं ते आईशी मी विठू विठूच्या स्वरात अणि तालातच सांगायचे. काही केल्या तिला ते कळायचे नाही. मग रागच यायचा. श्री काकाला बाबा अजून त्या पोपटाची विठू विठूची भाषा कळते आणि तुला आई असून कशी काय गं नाही कळत माझी भाषा? मग आईनेच एक गमतीशीर तोडगा शोधला. म्हणाली, ‘विठू विठू करताना बघ नीट जरा तो स्पेसिफिक ऍक्शन करतो. खायला नेताना तोंडाकडे हात नेतो. पाणी हवं असेल तर वेगळं. तू हा तसं केलंस तर कळेल की मला. मग काय ऍक्शनसकट माझं विठू विठू सुरू. आईनं पद्धतशीर मला उल्लू बनवलं पण कळलं कुठं तेव्हा. आमच्या श्री काकानं मागच्या अंगणात स्वतःला जाळून घेतलं. त्या विठूनं पण धसका घेतला आणि बोलेनासाच झाला. किती जाऊन जोरजोरात मी विठू विठू केलं. टवळी म्हटलं तरी बोललाच नाही. विठूनं माझ्याशी कट्टी केली होती. मग माईनं (त्या आजीनं) पिंजरा उघडला आणि सोडून दिलं विठूला. नाहीच आला तो परत. आजपण आठवताना पाणी आलंय डोळय़ात.

मग आली अंगणातल्या झाडावरची फुलपाखरं. हिरवी, पिवळी, निळी, चॉकलेटी, किरमिजी, गुलाबी, अनेक रंगांची. आईशप्पथ बचपन के वो दिन… एका फुलपाखराच्या मागे या झाडावरून त्या फांदीवर फॉलो करायचं. आमचा गेम होता मित्रमैत्रिणींचा. तीन चार फुलपाखरं आली की प्रत्येकानं एक फुलपाखरू फॉलो करायचं. ज्याचं फुलपाखरू गायब होईल किंवा दिसेनासं होईल तो हरायचा. ऍक्चुली मी तर नेहमीच हरायचे. मग एक पिवळे फुलपाखरू भेटलं एक दिवस. त्याला म्हटलं प्लीज रे आजतरी जिंकव. आणि जिंकले ना त्या दिवशी. खरंतर जेमतेम एक मिनिटाचा खेळ कारण ठरतंय कुठं ते पाखरू एका जागी. सुरवंट ते फुलपाखरू असा प्रवास, पण प्रत्यक्ष प्रवास पाहिलाय मी. अळी ते सुंदर पाखरू… मुंग्यांशी भारीच दोस्ती होती लहानपणी. लाल मुंग्या, काळय़ा मुंग्या, डोंगळे, मुंगळे… मुंगळय़ांना पकडायचं आणि स्वतःच्या अंगावर (हातावर) सोडायचे मग अंगभर ते फिरले की मज्जा यायची. लाल मुंग्या घरात आल्या की आज्जी खडू फिरवायची (हिट) नव्हतं तेव्हा बहुतेक. मग त्या मुंग्या मरायच्या. मला नाही आवडायचं मग चोरून कोपऱयात गूळ किंवा साखर नेऊन ठेवायचे. मग खूप मुंग्या यायच्या. एकदा त्याच मुंग्या कडकडून चावल्या आणि मग हा खेळ बंद झाला. काळय़ा मुंग्या तर असतील तिथे त्यांना रमू द्यायचे.

मग आली चोरून चोरून आणलेली कुत्र्याची पिल्लं शाळेत. शाळेतल्या एका कुत्रीला पिल्लं झाली. बिच्चारी एकटी एकटी क्याव क्याव करीत होती. सरळ उचलली आणि आमच्या वर्गाच्या बाजूला एक रूम होती तिथं नेऊन ठेवली. मग सगळय़ांच्या डब्यातून एक एक पोळी बाजूला काढायचो आणि तीनवेळा शू आली सांगून एकेक जण त्यांना नेऊन द्यायचो. चोरी कधी पकडली नाही गेली, पण मोठी झाल्यावर ती मस्ती मात्र खूप करायला लागली. मग त्यांना बाहेरच्या पटांगणात सोडून आलो आणि पी.टी.च्या तासाला त्यांच्याशी खूप खूप खेळायचो. मग मोठय़ा वर्गात गेलो तशी शाळेची बिल्डिंग, एरिया बदलला. पण खरंच त्या लहान वयात वेगवेगळय़ा प्राण्यांशी आलेला संपर्क आणि झालेला संवाद आजही मनात, आठवणीत आहे.

मग एकदा मत्स्यालयात गेले ऍक्वेरियम बघायला. खूप वेगवेगळे मासे दिसले आणि या माशांना मारून खायचं नाही म्हणून सातवीत मी जी व्हेजिटेरीयन झाले ती आजपर्यंत. राणीच्या बागेत भेटलेले मित्र आणि मग सिंगापूरच्या ज्युराँग बर्ड पार्कमध्ये माझी फर्स्ट फॉरिन टुर ती पण एकटीनं. वेगवेगळे पक्षी घाबरत का होईना तेव्हा हातावर बसवून घेतले. डोक्यावर ठेवून घेतले. ततपप करत अजगरसुद्धा गळय़ात घालून घेतला, पण प्रत्येक वेळी तो पाच मिनिटांचा संपर्क असला तरी या प्राण्याचा टच आठवतोय. फिल आठवतोय. आपण प्रेमानं त्यांना हात लावला ना की ते रेसिप्रोकेट करतातच. मग आले ते कल्याणातले टांगे. घोडय़ाच्या बग्गीत बसून स्टेशन ते घर असा प्रवास करायचे. त्या घोडय़ाला किती त्रास होत असेल ना।़।़ असं वाटायचं. पण घोडेवाला समजवायचा. त्याला प्रेमाने खाऊपिऊ घालतो नीट सांभाळते हेच काम आहे ना त्याचं. मग कोंबडय़ा आल्या आयुष्यात. कोंबडीला रात्रभर टोपलीखाली झाकून ठेवायचे. आजी मलाच सांगायची कधी ती मस्तीत चोच मारायची. कधी फडफड करत अंगावर यायची. मज्जा…

मी एकटी राहायला लागल्यावर कुठून कसं कोण जाणे एक मांजर घरात शिरलं. नुकतंच व्यायलेलं, दर दोन दिवसांनी जागा बदलायचं घरात. मग आधीचा कोपरा मी साफ करायचे. आधी पिल्लांजवळ गेले तर वसकन अंगावर आलं. हळूहळू त्याला कळलं बहुतेक ही छान आहे. पिल्लू मग रात्री पांघरूणात येऊन झोपायला लागली. शूटिंगवरून त्यांच्या ओढीने घरी जायची घाई व्हायला लागली. नावंबिवं नव्हती ठेवली मी त्यांची. पण बरेच दिवस ती होती बरोबर. मग अनेक दिवस कुणी जिवलग आलाच नाही आयुष्यात. आमच्या विहिरीत पूर्वी दोन कासवं होती. डुबकी मारायला उतरलो की चटकन पायरीवरून पाण्यात जायची. मला जाम आवडायची त्यांची कडक पाठ आणि मऊ लुसलुशीत शरीरं, बोट लावलं तरी पटकन आत आकसून घेणार. एका मैत्रीणीच्या घरचा ससा आवडायचा मला. पांढराशुभ्र, लाल गुंजेचे डोळे. तिच्याकडे मी अभ्यासाला गेले की बाजूला येऊन बसायचा. हात लावायला गेले तर धूम… खंडाळय़ाच्या घाटात आणि माथेरानला केळी, बिस्किटे हातातून खेचून घेणारी माकडं. आरे कॉलनीतल्या मोठय़ा मगरी. घरात घुसून घाण करून डोक्यात जाणारी कबुतरं. जेवणाचं ताट वालं की काव काव करत येणारा कावळा… जिच्यासाठी दाणापाणी ठेवून घर बांधलं ती चिऊताई. ताडोबाच्या जंगलातला वाघोबा. बापरे बालता बोलता किती प्राणी आले माझ्या आयुष्यात आठवलं.

खरं सांगू का हे सगळं आठवण्यामागचा उद्देश… तुम्ही पण जरा वेळ द्या स्वतःला… आयुष्यातले हरवलेले, विस्मृतीत गेलले काही क्षण आठवायला गोळा करून त्यांची पुडी बांधायला, माणसांशी जोडला गेलेला बंध दुखावू शकतो कधीतरी, पण या निरपेक्ष भावनेनं आपल्या आयुष्यात आलेले जीवलग आपल्याला फक्त आनंदच देतील.
बघा एकदा मागं वळून… पूर्वार्धात डोकावून…