टीका टिपणी व विरोधातून आपणास नवीन उर्जा मिळते – अण्णा हजारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निंदकांकडून माझ्यावर व राळेगणसिद्धीवर केलेल्या टीका टिपणी व विरोधातून आपणास नवीन उर्जा मिळते असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरूवारी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.

माझ्यावर टीका, निंदा तसेच विरोध करणारांना मी धन्यवाद देतो कारण तुमच्यामुळे मला नवीन उर्जा मिळत केल्याचे नमुद करून अण्णा पुढे म्हणतात, यापुढेही अशीच निंदा करत रहा, जेणेकरून मला नवी उर्जा मिळत राहील. आज 82 वर्षांच्या वयातही देशातील आणि परदेशातील लोक विशेषतः तरूण राळेगणसिद्धीला येउन प्रेरणा घेतात. या प्रेरणेतून राळेगणसिद्धी ऐवढे करता आले नाही, तरी काही ना काही करायला लागतात ही बाब मला समाजिक दृष्टीने महत्वाची वाटते.

महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांची होणारी हत्या हा समाज आणि देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. विशेषतः दिल्लीच्या निर्भया प्रकरणात आरोपींना 2013 मध्येच फाशीची शिक्षा सुनावली गेली. सात वर्षचा प्रदीर्घ कालावधी गेला पण अदयापही आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही. 2005 नंतर देशात 426 प्रकरणांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली पण कार्यवाही झाली नाही. महिलांवर होणा-या अन्याय, अत्याचार आणि हत्येच्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा होउनही न्याय मिळण्यास विलंब होतो हा सुद्धा समाजावर अन्यायच आहे. याला जबाबदार कोण ? प्राथमिक पुरावे जमा करणारे, कायदे करणारे की न्याय व्यवस्थेतील लोक ? हा संशोधनाचा विषय आहे. हैद्राबादमध्ये एनकाउंटर सारखे प्रकरण घडते आणि जनता जल्लोष करते हे बरोबर की चुक असा सवाल हजारे यांनी केला आहे.