एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला 1 कोटीची लाच घेताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) नगर उपविभागाच्या सहा.अभियंता (वर्ग 2) याला तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने नगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) नगर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता (वर्ग 2) याला तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या संदर्भामध्ये नाशिकच्या लाच प्रतिबंधक विभागाने अतिशय गोपनीय पद्धतीने हा सापळा रचून कारवाई केली.

अमित किशोर गायकवाड (वय 32 रा.प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर, नगर, मुळ रा. चिंचोली ता.राहुरी) असे त्या सहा अभियंत्याचे नाव आहे. दरम्यान, त्याने सदरची लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या करीता स्वीकारली असल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक समीष्ठा वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी नगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेऊन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्या करीता या बिलाचे कामाचे व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणून एक कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी नगर – संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या बाजूला सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता एका इनोव्हामध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिश्श्याची 50 टक्के कोठे पोहचवावी बाबत विचारले असता वाघ याने सांगीतले की, ‘राहू दे तुझ्याकडे, बोलतो मी. ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवून दे’. असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले आहे.

अभियंता गायकवाड ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची सुद्धा माहिती अगोदरच घेण्यात आलेली होती. तसेच काही कागदपत्रांची पडताळणी सुद्धा या पथकाने केली असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर आता या सर्व बाबीचा उलगडा नाशिक पथक करणार असून आता पुढील कारवाई ते करत आहे.