
बनावट प्रमाणपत्र सादर करून कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे रजिस्ट्रेशन मिळविणाऱ्या नगरमधील बोगस आर्किटेक्टवर नवी दिल्लीतील लोधी रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम मुकुंदराव नगरकर उर्फ ओम गवळी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
ओम नगरकर याने आर्किटेक्चर पदवीला प्रवेश न घेता परीक्षा पास झाल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून 2020 मध्ये कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर या शिखर संस्थेचे रजिस्ट्रेशन प्राप्त केले. यानुसार त्याला कौन्सिलचा रजिस्ट्रेशन क्रमांकदेखील देण्यात आला. परंतु, द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चरच्या नगर सेंटरने यावर आक्षेप घेतला. नगरकर याने सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे पुरावे त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरला सादर केले. त्यानुसार कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने ओम नगरकर याचे रजिस्ट्रेशन तातडीने गोठविले आणि त्यांना मूळ प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. कौन्सिलने अनेक पत्र लिहून खुलासा मागविला; मात्र नगरकर यांनी मूळ प्रमाणपत्र सादर केले नाही.
शेवटी कौन्सिलने 7 जुलै 2021 रोजी अंतिम नोटीस देऊन मूळ प्रमाणपत्रे विहित मुदतीत सादर केली नाही, तर बनावट कागदपत्रे दाखल करून कौन्सिलची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. तरीही नगरकर याने मूळ कागदपत्रे दाखल केली नव्हती. त्यामुळे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने ओम नगरकरविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करून कौन्सिलची फसवणूक केल्याचा गुन्हा लोधी रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.

























































