सलग दुसऱ्या दिवशी लोणीत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकला

उत्तर नगर जिल्ह्यात उदंड बिबटे झालेत. त्यांना जेरबंद करण्याचं आवाहन वनखात्याला आहे. काल रविवारी मध्यरात्री लोणी पीव्हीपी कॉलेज लगत सहावा बिबटया पिंजऱ्यात अडकवण्यात वनखात्यास यश आले आहे.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मक्याच्या शेतात साधारण दीड वर्ष वयाच्या बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतिक गजेवार, घटना स्थळी पोहचले व कोपरगावच्या वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे पाटील यांना माहिती देण्यात आली. रविवारी मध्यरात्री एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याच मकाच्या शेतात दुसरा बिबट्या आढळला. एकाच ठिकाणी दुसरा बिबटया जेरबंद झाल्याने परिसरात आणखी किती बिबटे अधिवास करून आहेत याचा आकडा सांगणे कठीण बनले असून या परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत.

डॉ सुनील आहेर, अजय बोधक, अनिल जाधव, अमोल ब्राम्हणे, नानासाहेब ब्राम्हणे, सुधीर ब्राम्हणे, दशरथ सोनवणे, मंडू खेमणर यांनी वनखात्यास मदत केली.लोणी, बाभळेश्वर, कोल्हार-भगवतीपूर परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. रोजच शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करून बिबटया त्यांना फस्त करीत आहे. वनखाते बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी कंबर कसून काम करीत आहे मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील उदंड बिबटे कसे जेरबंद करावे याचे आवाहन वनखात्या समोर आहे.