चायना मांजा विक्रेत्यांवर मनपाची कारवाई; नागरिक, युवकांचे प्रबोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

शहरात छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या चायना मांजाच्या विक्रीवर कारवाईसाठी महापालिकेची पथके कार्यरत झाली आहेत. बुधवारी काही विक्रेत्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. सुमारे 7 ते 8 किलो माल जप्त करण्यात आला असून विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील दुकानांची तपासणी करुन त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच नागरिक व युवकांचे चायना मांजा न वापरण्याबाबत प्रबोधन करुन आवाहनही केले जात असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. एन.एस. पैठणकर यांनी सांगितले.

चायना मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यात नागरिकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे चायना मांजाच्या वापरासह विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मकरसंक्रांतीचा सण जवळ आला असून, शहरात अनेक ठिकाणी पतंग व मांजा विक्रीची दुकाने सजली आहेत. बंदी असतांनाही चायना मांजाची छुप्या पध्दतीने विक्री सुरु असल्याने मनपाच्या पथकाकडून शहरात तपासणी सुरु झाली आहे. बुधवारी शंभराहून अधिक विक्रेत्यांना मनपाने नोटीसा बजावून दुकानांची तपासणी केली आहे. यात चायना माल जप्त करुन काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

दरम्यान, चायना मांजाच्या वापराचे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगत मनपाच्या पथकाकडून प्रबोधनही केले जात आहे. दुकानदारांनाही चायना मांजाची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. पैठणकर यांनी सांगितले.