नगर मनपाच्या तिजोरीची चावी कोणाकडे जाणार? महिनाअखेरीस स्थायी समितीचे आठजण होणार निवृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महापालिकेचा कोटय़वधींचा विकासनिधी हाताळणाऱ्या स्थायी समितीचा नवा सभापती कोण होणार? याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. मागील तीन वर्षांपासून या सभापतिपदासाठी प्रतीक्षेत असणारे कुमारसिंह वाकळे व उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या शर्यतीतून माघार घेतल्याने विनीत पाऊलबुद्धे अशी दोन नावे सध्या या पदाच्या शर्यतीत मानली जातात; पण या पदाआधी स्थायी समितीत जाण्याचे आव्हान या दोघांपुढे आहे. अर्थात, स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या आहेत. त्यामुळे या दोघांना सदस्यत्वाची संधी मिळू शकते; पण ती मिळेल की नाही, हा कळीचा मुद्दा आहे.

मनपा स्थायी समिती ही मनपाची तिजोरी मानली जाते. स्थायी समितीद्वारे कोटय़वधींचे आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे स्थायी समितीत जाण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाचा प्रयत्न असतो. या पार्श्वभूमीवर दरवर्षी जानेवारीअखेरीस स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त होत असतात. त्यांच्या जागी रिक्त झालेल्या जागा ज्या पक्षाच्या असतील, त्या पक्षाच्या तेवढय़ा नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. संबंधित पक्षांचे गटनेते जी नावे सुचवतील, ती नावे महापौर महासभेत जाहीर करतात. त्यानंतर या सदस्यांची स्थायी समितीत वर्णी लागते.

सध्या मनपातील पक्षीय बलाबलानुसार 16 सदस्यांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5, भाजप 4, काँग्रेस 1 व बसप 1 अशी सदस्यसंख्या आहे. रिक्त होणाऱ्या आठ जागांवर पक्षीय कोटय़ानुसार सदस्यांची निवड केली जाणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये राष्ट्रवादीचे तीन, तर शिवसेना व भाजपचे प्रत्येकी दोन व काँग्रेसची एक जागा आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये यानुसारच त्या-त्या पक्षाचे नवे सदस्य स्थायी समितीत येणार आहेत. त्यामुळे या जागांवर निवड होण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. गटनेत्यांना भेटण्यासह पक्ष पदाधिकारी, तसेच वरिष्ठ नेत्यांना भेटून त्यांच्याद्वारेही प्रयत्न सुरू झाले आहेत.

हे सदस्य होणार निवृत्त
मनपा स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. या 16 सदस्यांपैकी आठ सदस्य 31 जानेवारीला निवृत्त होणार आहेत. ज्या सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होणार आहे, असे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे श्याम नळकांडे व विजय पठारे, राष्ट्रवादीचे डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे व परवीन कुरेशी, भाजपचे मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे आणि काँग्रेसच्या सुप्रिया जाधव यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सभापती कोण होणार? ही चर्चाही सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीकडे सभापतीपद
मनपातील महाविकास आघाडीच्या सत्तेत शिवसेना व राष्ट्रवादी असून, महापौरपद, महिला व बालकल्याण समिती सभापतिपद आणि सभागृहनेतेपद ही तीन पदे शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद, स्थायी समितीचे सभापतिपद व महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतिपद राष्ट्रवादीकडे आहे. अखेरचे सातवे राहिलेले विरोधी पक्षनेतेपद शिवसेना व राष्ट्रवादी वगळता अन्य मोठा असलेल्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे जाणे अपेक्षित आहे; पण यावर अजून नवी नियुक्ती झालेली नाही. सध्या हे पदही राष्ट्रवादीकडेच आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीत स्थायी समितीचे नवे आठ सदस्य व नवा सभापती असे दोनच विषय मनपातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या अजेंडय़ावर आहेत.