खासगी रुग्णालयात बिले तपासण्यासाठी ऑडिटर, नगर महापालिका आयुक्तांचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दणका दिला आहे. या रुग्णालयात कोविड उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णाला बरे झाल्यानंतर घरी सोडण्यापूर्वी त्याला आकारण्यात आलेल्या बिलांची तपासणी आता केली जाणार आहे. शहरातील 26 खासगी रुग्णालयांसाठी असे 32 ऑडिटर (लेखापरीक्षक) महापालिकेने नेमले आहेत.

कोरोनाकाळात मागील वर्षी रुग्णांना जादा बिले आकारल्याच्या तक्रारीवर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपजिल्हाधिकारी स्तरावर पथक नेमून बिलांची तपासणी केली होती. त्यावेळी 15 रुग्णालयांनी 1 कोटी 13 लाख रुपयांची वाढीव बिले आकारल्याचे निष्पन्न झाले होते. या वाढीव रकमेची वसुली करून संबंधित रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश महापालिकेने या रुग्णालयांना दिले होते. त्यापैकी काहींनी असे पैसे जमा केले तर काहीजण न्यायालयात गेल्याने हा विषय अजूनही प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱया लाटेच्या काळात खासगी रुग्णालयांकडून अवाच्या सव्वा बिले आकारणी होऊ नये, यासाठी मनपाने 32 ऑडिटरची नियुक्ती करून खासगी रुग्णालयांतून आकारल्या जाणाऱया बिलांची आधीच तपासणी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयाबाहेर पडतानाच योग्य बिल अदा करता येणार आहे.

खासगी रुग्णालयांमधील वाढीव बिलांची तपासणी रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या आधीच करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी हॉस्पिटल मालकांनी रुग्णांचे बिल महापालिकेने नियुक्त केलेल्या ऑडिटरकडे रुग्णाला डिस्चार्ज देण्याअगोदर जमा करणे बंधनकारक असणार आहे. शासकीय नियमानुसार असलेल्या बेड व अन्य विविध वैद्यकीय सुविधांच्या दरानुसार बिलांच्या तपासणीनंतर रुग्णांच्या नातेवाईकांना हे बिल भरावे लागेल. दरम्यान, बिलांची तपासणी करणाऱया ऑडिटरची यादी व माहिती सर्व खासगी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर लावली जाणार आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

खासगी रुग्णालये व ऑडिटरची नावे

n साईदीप हॉस्पिटल – पी. यू. चव्हाण, नोबेल हॉस्पिटल- जे. व्ही. गायकवाड, डेली हेल्थ हॉस्पिटल- आर. एस. कदम, हराळ हॉस्पिटल- एम. पी. पेटकर व एस. एल. कुलकर्णी, रेणुकामाता हॉस्पिटल- के. एफ. गायकवाड, स्वास्थ्य हॉस्पिटल- जे. आर. चौरे, मॅककेअर हॉस्पिटल- अनंत साठे, ईम्पल्स हॉस्पिटल- रवींद्र काजळकर, बर्न सेंटर- एस. पी. चक्राल, साई एशियन हॉस्पिटल- एस. एन. वडणे, लाईफलाईन हॉस्पिटल- आर. बी. भालशंकर व वर्षा गोरकर, ऍपेक्स हॉस्पिटल- पी. आर. सैंदाणे, न्यूक्लिअस हॉस्पिटल- पी. टी. गायकवाड, विघ्नहर्ता हॉस्पिटल- जे. आर. ठाकरे व पी. एस. गडाख, श्रीदीप हॉस्पिटल- व्ही. बी. नडे, फाटके हॉस्पिटल- एम. एस. सोनटक्के, क्रिस्टल हॉस्पिटल- एस. बी. पवार, अनिल जाधव हॉस्पिटल- शांताराम ठाकरे, प्राईम केअर हॉस्पिटल- आर. एस. कावट, सुरभी हॉस्पिटल- जे. एम. बनसोडे व पी. ए. ठाकूर, विघ्नहर्ता हॉस्पिटल- एस. सी. दराडे, युनायटेड सिटी हॉस्पिटल- विजय वाळके, शिवनेरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल – विजया शेळके, बूथ हॉस्पिटल- पी. पी. आवारे, केअर प्लस हॉस्पिटल- आर. जी. मोरे, राजमाता कोविड सेंटर – रा. स. जाधव.