नगर-सोलापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, अडील लाखांच्या ऐवजासह सीसीटीव्हीचे डीव्हीआरही नेले चोरून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-सोलापूर महामार्गावरील दहीगाव साकत गावानजीक असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या केतन पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा पडला. आज पहाटे घडलेल्या घटनेत सहा ते सात आरोपींनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरेही चोरून नेले आहेत. तर, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पाच पथके पाठविण्यात आली आहेत.

रात्री अडीच-तीनच्या सुमारास सहा ते सातजण केतन पेट्रोल पंपावर आले. पंपावरील कर्मचारी अविनाश काळे यांना डिझेल भरावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले. डिझेल भरून देण्यासाठी काळे त्यांच्या गाडीजवळ आले असता, एकाने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. यानंतर रिव्हॉल्व्हर घेऊन दोनजणांनी थेट पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये प्रवेश केला. केबिनमधील एक लाख 47 हजार रुपयांची रोकड, तसेच कर्मचारी गणेश सिसोदिया यांच्याकडील 25 हजार रुपये यांसह उर्वरित कर्मचाऱ्य़ांचे मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख 55 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. अर्ध्या तासाहून अधिक काळ हे चोरटे त्या ठिकाणी होते. त्यांनी केबिनमध्ये लावलेले सीसीटीव्ही चोरटय़ांनी काढून टाकले असून, केबिनमधील डीव्हीआर घेऊन चोरटय़ांनी पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचा आदेश दिला. नगर तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तपास करीत आहेत.