धक्कादायक; दहा वर्षीय बालकाची दगडाने डोके ठेचून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील वरखेड येथे एका दहा वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. मंगळवारी रामडोह रस्त्याच्या बाजूच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोहम उत्तम खिलारी (वय 10 वर्षे), राहणार बुलढाणा, (हल्ली वरखेड, ता. नेवासा) असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे.

मयत सोहम हा गेल्या आठ-नऊ वर्षांपासून आपल्या दोन भाऊ व आईसह सावत्र वडिलांसमवेत वरखेड येथे वास्तव्यास होता. सोहमचा मृतदेह आज पहाटे रामडोह रस्त्यालगतच्या पाटचारी परिसरातील रस्त्याचे कडेला छिन्नविच्छिन्न अवस्थेत परिसरातील लोकांना दिसला. या घटनेची माहिती लोकांनी नेवासा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनस्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

मयत सोहमची आई व सावत्र वडील समाधान यांच्याकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा वरखेड गावात ऐकायला मिळत आहे. दहा वर्षीय बालक हा आपली पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी गावात भाकरी मागत होता. अशीच माहिती समोर आली आहे. तो नेहमी भीतीच्या सावटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात. त्यामुळे त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यासारखे बाहेरचे कोणीही असण्याची शक्यताच नाही. पोलिसांचाही तसाच कयास आहे. खरी माहिती तपासाअंतीच समोर येईल.