गट-गणांच्या अंतिम रचनेला विभागीय आयुक्तांची मान्यता, नगर जिल्हा परिषद; सोमवारी होणार प्रसिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप रचनेवर निर्धारित मुदतीत दाखल झालेल्या तब्बल 65 नागरिकांच्या हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींची सुनावणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर झाली. त्यानंतर 65 पैकी आठ हरकती ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. उर्वरित हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. 8 हरकती दाखल करून घेत गमे यांनी अंतिम गट व गणांच्या रचनेला मान्यता दिली असून, सोमवारी (दि. 27) गट व गण अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मागील वर्षभरापासून प्रशासनाची तयारी सुरू होती. लोकसंख्येच्या निकषानुसार यंदा जिल्हा परिषदेचे एकूण 85 गट, तर पंचायत समितीचे 170 गण असणार आहेत. 2 जून रोजी गट व गणांची प्रारूप रचना जाहीर झाल्यावर 8 जूनपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. या हरकतींवर 22 जूनपर्यंत निर्णय घेऊन अंतिम गण-गट रचनेला मंजुरी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.

दाखल झालेल्या हरकतींवर 9 जून रोजीपर्यंत नाशिक येथे विभागीय आयुक्त गमे यांच्यासमोर सुनावणी झाली. यापैकी 8 हरकतदारांच्या हरकती ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यात नगर तालुक्यातील समीर पटेल, रामदास भोर, डॉ. दिलीप पवार, अक्षय कुटे, प्रीतेश दरेकर, कानिफनाथ कोतकर, राधाकृष्ण वाळूंज तसेच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील नितीन औताडे यांचीही हरकत मंजूर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त गमे यांनी 22 जून रोजी गट-गणांच्या प्रभागरचनेस अंतिम मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले सोमवारी (दि.27) रोजी गट-गणांच्या प्रभागरचनेच्या मसुद्यास अंतिम मंजुरी प्रसिद्धी देणार आहेत.