
नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीतील तापमान वाढून टाकी फुटल्याने जवळपास 4 हजार मेट्रिक टन मळी वाहून गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात कारखान्याचे कोटय़वधींचे नुकसान झाल्याची माहिती समजली.
नागवडे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखाना साखरेबरोबर उपपदार्थ तयार करतो. कारखान्याच्या अर्कशाळा विभागात टाक्यांमध्ये मळी साठवण्यात येते. गुरुवारी (दि. 10) पहाटे अर्कशाळेतील टाकीच्या आतील तापमान वाढल्याने ही टाकी अचानक फुटली. या टाकीची साठवण क्षमता साडेचार हजार मेट्रिक टनाची असून, या टाकीत 4 हजार 100 मेट्रिक टन मळी साठविलेली होती. टाकी फुटल्याने ही हजारो लिटर मळी वाहून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत कारखान्याची संरक्षक भिंतदेखील कोसळली. घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱयांना सूचना केल्या.
कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे, अर्कशाळा विभागप्रमुख बबनराव गोरे, सुरक्षाअधिकारी बाळासाहेब लगड यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखाना प्रशासनाने उत्पादन शुल्क विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांना घटनेची माहिती दिली.

























































