नागोठण्यात लाखो विटांचा चिखल, मुसळधार पावसाचा तडाखा; वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल

नागोठणेतील वीटभट्टी व्यावसायिकांना मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसात लाखो कच्च्या विटांचा अक्षरशः चिखल झाला आहे. अतोनात नुकसान झाल्यामुळे वीट व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वीटभट्टीमालकांनी शासनाकडे केली आहे.

नागोठणे विभागात अंबा नदीच्या किनाऱ्यावर अनेक वीटभट्ट्या आहेत. चांगली माती, योग्य हवामान तसेच मजुरांची उपलब्धता असल्याने नागोठणे विभागात वीटभट्टी व्यवसाय दरवर्षी तेजीत असतो. मात्र यंदा मे महिन्यातच पावसाने धडाक्यात आगमन केल्याने वीटभट्टी व्यावसायिकांसाठी तो कर्दनकाळ ठरला आहे. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले असून भट्टया वाचवण्यासाठी व्यावसायिकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तीस ते चाळीस हजारांपासून ते एक लाख विटांपर्यंत विटा पावसात विरघळून गेल्या आहेत. तालुक्यासह नागोठणे विभागातील व्यावसायिक हे शेतकरी असून पावसामुळे झालेले नुकसान कर्जाचा डोंगर वाढवणारे असल्याची कैफियत वीटभट्टी व्यावसायिक वसीम बोडेरे यांनी मांडली.

कंबरडे मोडले
यावर्षी रोहा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून विटांची मागणी असल्याने व्यावसायिक आनंदात होते. एक व्यावसायिक अंदाजे आठ ते दहा लाखांपर्यंत विटांचे उत्पादन करीत असून यावर्षी विटांना हजारी चार ते साडेचार हजारांपर्यंत भाव होता. परंतु त्यांच्या आनंदावर पावसाने विरजण टाकले. पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.