नागपूर विभागासाठी 1 लाख 14 हजार कोविशिल्ड लसीचे डोस दाखल

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात विभागातील नोंदणी झालेल्या 93 हजार 309 कोरोनासंदर्भात शासकीय व खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून यासाठी सिरम इन्स्टिट्यूट येथून 1 लाख 14 हजार कोविशिल्डचे डोसेस प्राप्त झाले आहेत. विभागातील 34 केंद्रांवरुन कोविशिल्डची लस देण्यात येणार असून याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी आज दिली.

कोरोनावरील लसीकरणासाठी कोविशिल्ड ही लस आज पहाटे नागपूर येथे पोहचली असून आज सकाळी सर्व जिल्ह्यांसाठी विशेष शितगृह असलेल्या वाहनाने रवाना करण्यात आली आहे.  विभागात 34 केंद्रांद्वारे 16 जानेवारीपासून नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिमेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून प्रत्यक्ष लसीकरणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रन आयोजित करुन लसीकरणाची पूर्वतयारी झाली आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज सरासरी शंभर आरोग्य कर्मचारी लसीकरण करण्याचे नियोजन आहे.

सिरम इन्स्टिट्यूटतर्फे नागपूर विभागासाठी कोविशिल्ड लसीचे 1 लाख 14 हजार डोस प्राप्त झाले असून त्यानुसार जिल्हानिहाय वितरित करण्यात आले आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी 9 हजार 500, चंद्रपूर 20 हजार, गडचिरोली 12 हजार, गोंदिया 10 हजार, नागपूर 42 हजार तर वर्धा जिल्ह्यासाठी 20 हजार 500 कोविशिल्ड डोसेसचा समावेश आहे.

लसीकरणासाठी जिल्हानिहाय यंत्रणा सज्ज असून प्रत्यक्ष लसीकरणासाठी विभागात 34 केंद्रांद्वारे प्रत्यक्ष लसीकरण करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 12 केंद्र राहणार आहेत. यामध्ये नागपूर महानगर क्षेत्रातील पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांचा समावेश आहे.

शहरातील पाच केंद्रांमध्ये डागा माहिला रुग्णालय, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाल येथील डायग्नोसिस सेंटर येथे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील केंद्रामध्ये उपजिल्हा रुग्णालय रामटेक, कामठी, ग्रामीण रुग्णालय उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडखैरीचा समावेश आहे.

93 हजार 309 आरोग्य सेवकांची नोंदणी

कोरोना काळात प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांची नोंदणी करण्यात आली असून, विभागात 93 हजार 309 आरोग्यसेवकांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्डचा पहिला डोस प्राधान्याने देण्यात येत आहे.

नोंदणी झालेल्या जिल्हानिहाय आरोग्य सेवकांमध्ये नागपूर शहरातील 25 हजार 164 तर नागपूर ग्रामीण भागातील 9 हजार 169 अशा 34 हजार 333 जणांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील 16 हजार 754, भंडारा 7 हजार 602, चंद्रपूर 16 हजार 110, गडचिरोली 9 हजार 947 तर गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार 563 आरोग्यसेवकांची नोंदणी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या