Nagpur news हिंगणा MIDC तील कंपनीला भीषण आग, तिघांचा मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपुरातील हिंगणा एमआयडीसीमध्ये असणाऱ्या अॅग्रो कंपनीला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हिंगणा वाडी रोड परिसरातल्या कटारिया ऍग्रो या कंपनीच्या गोडाऊनला आग लागली आहे. शेतातील तुराट्या-पराट्यापासून ब्लॉक बनवण्याचे काम ही कंपनी करते. गोडाऊनमध्ये असे तयार ब्लॉक साठवून ठेवण्यात आले होते. याच ब्लॉकला आग लागली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने संपूर्ण गोडाऊनला कवेत घेतले.

आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठले आहेत. याची माहिती मिलताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.