नियम पाळले नाहीत तर पुन्हा ‘लॉकडाऊन’

नागपुरात गेल्या काही दिवसांत झपाटय़ाने वाढलेली कोविड-19 रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली, परंतु हे करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नागपुरात नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही हे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनासंदर्भात नागपुरातील परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळला होता. आज 11 जुलै आहे. चार महिन्यांत रुग्णांची संख्या 1789 इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाटय़ाने वाढली. राज्य शासनाने 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि नियमांचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते. मात्र, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले आहे.

खासगी किंवा शासकीय कार्यालयात 15 व्यक्ती किंवा 15 टक्के यापेक्षा जी संख्या अधिक असेल त्या संख्येत कर्मचाऱयांना बोलावून काम करण्याची मुभा देण्यात आली होती, परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे. दुकाने सुरू करण्यासंदर्भातील नियमही पाळला जात नाही. अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहेत. परिणामी आता नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने काढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे नियमांचे पालन करा, स्वतः सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

उल्लंघन करणाऱयांवर होणार गुन्हा दाखल

सोमवारपासून मनपा आणि पोलीस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर ‘वॉच’ ठेवणार आहे. कुणी नियम तोडताना आढळून आल्यास मनपा आणि पोलीस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती नागरिकांनी द्यावी. अशा नियम मोडणाऱया व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालये आदींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या