Maharashtra Winter Session – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकले

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होताच पहिल्या दिवशी निघालेल्या चार मोर्चांमुळे संत्रानगरी घोषणांनी दणाणून गेली. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही, भीक नको हक्क द्या, न्याय द्या, न्याय द्या… सन्मानाने जगण्याची संधी द्या… या सरकारचे करायचे काय – खाली डोके वर पाय अशा आरोळय़ा ठोकत मोर्चेकऱ्यांनी सरकारची पहिल्याच सभागृहाबाहेर चौफेर कोंडी केली. चंद्रपूर जिह्यातील दिंडोरा प्रकल्पग्रस्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकासमंचने काढलेला हलगी मोर्चा आणि युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटनेने काढलेला पवित्र पोर्टल मोर्चा लक्षवेधी ठरला.

  • दिंडोरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून प्रकल्पग्रस्तांना 2013 च्या कायद्यानुसार भूसंपादनाचा मोबदला देण्यात यावा व दिंडोरा प्रकल्पग्रस्तांना मंजूर 240 कोटींचे पॅकेज त्वरीत जाहीर करावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या रूपात मैदानात उतरले. संघटनेचे मार्गदर्शक विलास भोंगाडे आणि अध्यक्ष पुंडलिक तिजारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
  • विदर्भ विकलांग संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून काढण्यात आलेला मोर्चा टेकडी मार्गावरील पॉइंट येथे दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास दाखल झाला. काही काळ शांत राहिलेल्या आंदोलकांनी पुढे जाण्यासाठी बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न करीत पोलिसांसोबतही वाद घातला. त्यामुळे काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • दिव्यांग शाळांच्या अनुदान धोरणानुसार विनाअनुदानित दिव्यांग शाळांना तसेच अनुदानित 121 दिव्यांग शाळांना 100 टक्के अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचातर्फे विधान भवनावर मोर्चा धडकला.
  • स्थानिक स्वराज संस्था व खासगी अनुदानित संस्थामध्ये शिक्षकांची भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’ निर्मिती केली. याचा अनेकांना फायदा झाला. परंतु, काही व्यक्तींचा पवित्र पोर्टल बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर काही संस्थाचालक शिक्षक भरती करताना पैशाची मागणी करतात. त्यामुळे पवित्र पोर्टल अधिक पारदर्शक करावे आणि यात काही सुधारित बदल करावे, या मुख्य आणि अन्य मागण्यांसाठी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या नेतृत्वात भावी शिक्षक मैदानात उतरले. मोर्चात सहभागी भावी शिक्षकांनी मागण्या पूर्ण करण्याबद्दल घोषणाबाजी केली.