गृहमंत्र्यांच्या शहरातच एका दिवसात दोन हत्याकांड

ठाणे, जळगाव, मुंबईपाठोपाठ महाराष्ट्राच्या उपराजधानीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात शुक्रवारी दिवसभरात दोन हत्याकांड घडले या दोन्ही घटना नंदनवन परिसरात घडल्या आहेत. शुक्रवारी सकाळी मालकाने केलेल्या मारहाणीमुळे कारचालकाचा मृत्यू झाला, तर मध्यरात्री लकडगंजमध्ये जुगार अड्डा चालविण्याच्या वादातून तीन ते चार युवकांनी धारदार शस्त्रांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. गेल्या पंधरवडय़ातील नागपुरातील हे पाचवे हत्याकांड आहे.

नागपूरच्या जुना बगडगंज परिसरात शुक्रवारी सकाळी कारचालक म्हणून नोकरी करीत असलेला सचिन उईके हा दोन दिवसांपासून कामावर जात नव्हता. त्यामुळे आरोपी मालक दर्शन भांडेकर याने चिडून शुक्रवारी सकाळी जुना बगडगंज चौकात सचिन उभा असताना कामावर येत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. यामध्ये सचिन बेशुद्ध पडून मृत पावला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दर्शन भांडेकरवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुक्रवारी मध्यरात्री लकडगंज परिसरात पोलिसांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे मोठमोठे जुगार अड्डे सुरू आहेत. विलास ऊर्फ मटर रामकृष्ण वानखडे व नीरज भोयर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये नीरज भोयर या युवकाचा मृत्यू झाला. विशाल राऊत असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.