
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली यासंदर्भात वृत्तवाहिन्यांवर चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे देखील त्यावेळी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत होते. यासंदर्भात अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता पवार साहेब आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या महत्वाच्या भेटीवेळी मी बाहेर होतो, असं अजित पवार म्हणाले.
विरोधीपक्ष सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. यासंदर्भात विचारले असता, ‘मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना काही काळ द्यावा लागतो. आम्ही विरोधात असताना भाजपला एक वर्ष दिलं होतं. हे उद्धवजींचं पहिलंच अधिवेशन आहे. त्यांना विरोधकांनी वेळ दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरादाखल केलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणासंदर्भात बोलताना ‘राजकीय टीकेला त्यांनी उत्तर दिलं. शेतकऱ्यांना आतापर्यंत किती हफ्ता देण्यात आला आहे ते जयंत पाटील यांनी सांगितलं. आर्थिक जबाबदाऱ्या उचलताना सर्व सूक्ष्मबाबींचा विचार करणे मुख्यमंत्र्यांसाठी आवश्यक आहे. तेव्हा त्यांना त्यासाठी काही वेळ निश्चित लागेल’, असं त्यांनी सांगितलं.




























































