मास्क न घातल्याने युवकाच्या हाता-पायात खिळे ठोकले, युवक बनाव करत असल्याचा पोलिसांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य- etv bharat

मास्क न घातल्याने एका तरुणाच्या हातापायात खिळे ठोकल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे. पीडीत तरुण त्याच्या आईसह वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेले असाताना हा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेली इथली ही घटना असून पीडीत तरुणाचं नाव रणजित आहे. रणजित हा जोगी नवादा गावचा रहिवासी आहे. त्याला घेऊन त्याची आई पोलीस अधिकारी रोहीत सिंह सजवाण यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आली होती. रणजितच्या आईने म्हटलंय की मास्क न घातल्याने आपल्या मुलाला 3 पोलीस कर्मचारी घेऊन गेले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांनी रणजितला मारहाण केली आणि नंतर त्याच्या हातापायात खिळे ठोकले.

पोलिसांनी मात्र हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. रणजितविरोधात मास्क न घातल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. रणजितवर यापूर्वीही काही गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस जेव्हा रणजितच्या घरी पोहोचले तेव्हा तो फरार झाल्याचं त्यांना कळालं होतं. एक जुनं प्रकरण रणजितच्या अंगलट येण्याची त्याला भीती वाटत आहे. त्यातून सटकण्यासाठी रणजितने हा बनाव रचल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अटकेपासून बचाव व्हावा यासाठी रणजितने हे सगळं नाटक रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

उत्तर प्रदेशातील 20 जणांना दिला कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचा कॉकटेल डोस

हिंदुस्थान आणि नेपाळच्या सीमेलगत असलेल्या औधाई कालान नावाच्या एका गावातील 20 जणांना कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचा कॉकटेल डोस देण्यात आला आहे. हे गाव उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील आहे. या 20 जणांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. दुसरा डोस हा 14 मे रोजी देण्यात आला होता.

दोन वेगवेगळ्या लसी घेतल्या असल्या तरी या 20 जणांना त्याचा त्रास झालेला नाहीये. ही चूक कशी झाली आणि कोणी केली हे शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन वेवेगळ्या लसींचे डोस घेतलेल्या 20 जणांपैकी एकाने सांगितले की त्याला 1 एप्रिलला कोविशील्डची लस टोचण्यात आली होती. 14 मे रोजी तो दुसऱ्या डोससाठी गेला होता. लसीकरण केंद्रावर पहिला डोस कोणत्या लसीचा दिला आहे हे पाहण्याची कोणीही तसदी घेतली नाही असं या व्यक्तीने सांगितलं आहे. त्या दिवशी (14 मे रोजी) या नागरिकाला कोवॅक्सिनची लस टोचण्यात आली.

दोन वेगवेगळ्या लसी घेतल्याने काहीतरी त्रास होऊ शकेल अशी या नागरिकांना भीती वाटत आहे. सिद्धार्थनगर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीप चौधरी यांनी या प्रकाराबाबत बोलताना म्हटले की लसीकरणासाठीच्या नियमांचे स्पष्टपणे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या लसी देणं योग्य नसून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हिंदुस्थानने गाठला 20 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा

हिंदुस्थानने आता अमेरिकेपाठोपाठ 20 कोटी नागरिकांहून अधिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणारा दुसरा देश बनला आहे. कोरोना लसींवरून देशात होणारे राजकारण आणि लसींचा तुटवडा या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हिंदुस्थानने हा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हिंदुस्थानने 130 दिवसांत 20 कोटींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशाला ही संख्या गाठण्यासाठी 124 दिवस लागले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 20 कोटी 4 लाख 94 हजार 991 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यात 97,94,835 आरोग्य कर्मचारी या लसीचा पहिला तर 67,28,443 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.