तुफानी पावसाने नालासोपाऱ्याला पुन्हा बुडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
NALASOPARA-STATION-AREA-UNDER WATER

शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या तुफानी पावसाने वसई तालुक्याला पुन्हा बुडवले. सोसाटय़ाच्या वाऱयासह कोसळणाऱया पावसाचा जोर इतका होता की सकाळपर्यंत सर्व नाले तुंबले आणि संपूर्ण वसई-विरार-नालासोपारा परिसर पाण्याखाली गेला. नालेसफाईचा पालिकेचा दावा पुन्हा फोल ठरल्याने वसई, विरारकरांना सलग चारवेळा पुराचा सामना करावा लागला.

गणेशोत्सवापासून आगमन केलेल्या पावसाने आपला मुक्काम वाढवला आहे. सकाळ-संध्याकाळ पावसाच्या तुरळक सरी पडत असताना शनिवारी रात्रीपासून अचानक जोर वाढवला. त्यामुळे नालासोपारा व विरारमधील बंदिस्त गटारे तुंबली. पाण्याचा निचरा होत नसल्याने पालिकेच्या नालेसफाईचा दावा पुन्हा एकदा खोटा ठरला. त्याचा फटका मात्र येथील रहिवाशांना सहन करावा लागला. सर्वत्र पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक दुकाने व तळमजल्यांवरील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. रविवारी दुपारनंतर पावसाने थोडी उसंत घेतल्याने पाण्याचा निचरा झाला.

महिलेचा बळी

गुडघाभर पाण्यातून चालत असताना विजेचा शॉक लागून 28 वर्षी ज्योत्स्ना परमार हिला जीव गमवावा लागला. त्या दळण आणण्यासाठी तुंबलेल्या पाण्यातून जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.

– विरार येथील विवा कॉलेजजवळील रस्ता पाण्याखाली गेला. नालासोपारा येथील गालानगर, तुळींज पोलीस ठाणे; सेंट्रल पार्क, आचोळे परिसरातील सखल भागात गुढघाभर पाणी साचले होते.

– रिक्षा व चारचाकी वाहनांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता. ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद होती.

– वसई पूर्व येथील गोलानी औद्योगिक परिसरात दोन फूट पाणी साचले होते. वसई पश्चिम येथील देवतलाव येथे पाण्याचा निचरा होऊ न शकल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी रस्त्यावर होते.