
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर दिग्गज कलाकार नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. हे सर्व आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळून लावत तनुश्रीविरोधात खटला दाखल करणार असल्याचे जाहीर केले. मात्र यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तनुश्रीला पाठिंबा देत आहे. दरम्यान आता या आरोपांनंतर नाना पाटेकर हे सध्या अज्ञातवासात गेल्याचे समजते.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नाना पाटेकर हे सध्या फराह खानच्या हाऊसफुल्ल 3 या चित्रपटाच्या शूटींमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच ते चित्रपटाच्या टीमसोबत जैसलमेरला रवाना झाले होते. मात्र जेव्हापासून हे आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले, तेव्हापासून नाना पाटेकर चित्रपटाच्या सेटवर आलेले नाहीत. शेड्युलनुसार गुरुवारपासूनच नाना पाटेकर यांना सेटवर हजर होणे गरजेचे होते. मात्र, गेले दोन दिवस ते सेटवर फिरकलेले देखील नाही. त्यामुळे सध्या नाना पाटेकर यांच्या शिवायच चित्रपटाचे शूटींग सुरू आहे.
हाऊसफुल्ल 3 या चित्रपटात अक्षय कुमार, नाना पाटेकर, बॉबी देओल, क्रिती सेनन आणि पूजा हेगडे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी पावसाळ्यात रिलीज होणार असल्याचे समजते.

























































