लुटारूला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

‘मित्र’च्या (महाराष्ट्र इन्फरमेशन अॅण्ड ट्रान्सफॉर्मेशन संस्था) उपाध्यक्षपदी अजय आशर यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. आशर यांची नियुक्ती करून शिंदे-फडणवीस सरकारने चुकीचा पायंडा पाडला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

अजय आशरसारख्या लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. अजय आशर या व्यक्तीबद्दल भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आक्षेप घेतला होता. मग आता भाजपचे मनपरिवर्तन झाले आहे का? काल ज्या व्यक्तीवर आक्षेप घेतला त्याच व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणे कितपत योग्य आहे? या नियुक्तीमागे भाजपचाही काही स्वार्थ आहे का, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

भाजपचा पेशवाई आणण्याचा डाव!

भाजपच्या नेत्यांची आजवरची बहुतांश विधाने लक्षात घेता त्यांचा पेशवाई आणण्याचा डाव आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर भाजपकडून कारवाई केली जात नाही. त्यावरून उदयनराजे आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पटोले म्हणाले, यापूर्वीदेखील कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केले होते. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटनेनंतर काँग्रेस पक्षाकडून जाहीर भूमिका मांडत निषेध नोंदविला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पण त्यावर भाजपने कोणतीही भूमिका मांडलेली नाही. पण भाजप नेत्यांची आजवरची विधाने लक्षात घेता त्या माध्यमातून पेशवाई आणण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे पेशवाई किंवा शिवशाहीसोबत राहायचे आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे असे पटोले म्हणाले.