नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात

>> विजय जोशी

सन 1983 व 89 साली त्यावेळच्या बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि पोचमपाड अर्थात श्रीरामसागर व निझाम सागर या तेलंगणातील अर्थात तत्कालीन आंध्रप्रदेशातील प्रकल्पांच्या फुगवट्यामुळे 110 गावांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोबतच तेलंगणात झालेल्या धुवाधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव या तालुक्यात हे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांचे भवितव्य यंदा पाण्यात बुडाले आहे.

निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 पासून तीन किलोमीटरवर असलेल्या पोचमपाड या गावी श्रीरामसागर हा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या सीमेपासून 94 किलोमीटरवर हा प्रकल्प आहे. तेलंगणातील गोदावरी नदीच्या पलीकडे श्रीराम सागर धरण हे आदिलाबाद, करीमनगर, वरंगल, नलगुंडा आणि खम्मम जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. पोचमपाड अर्थात श्रीरामसागर या धरणाचे 42 दरवाजे आहेत. जलाशयाची क्षमता 90 टीएमसी एवढी असून 284 किलोमीटर लांबीच्या या धरणात काकतीया कालवा, लक्ष्मी कालवा, सरस्वती कालवा आणि पूर प्रवाह कालवा यांचा समावेश आहे. प्रकल्प मोठा असल्याने तसेच हवामानाचा नेम नसल्याने अनेकदा हा प्रकल्प कोरडा राहिला.

गोदावरी नदीवर राज्य सीमेच्या पलीकडे महाराष्ट्रात बारा बंधारे बांधून गोदावरीचे पाणी अडविल्याने दहा वर्षापूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्य सीमेवर धर्माबादजवळ प्रचंड आंदोलन करुन गोंधळ केला होता. त्यावेळी प्रचंड फौजफाटा लावण्यात आला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी नायडू यांना अटक करुन संभाजीनगरला नेले होते.

17 ते 19 ऑगस्ट या काळात देगलूर, मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. सोबतच कामारेड्डी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या निजामसागर धरणाचे २९ दरवाजे उघडण्यात आल्याने लेंडी नदीला पूर आल्याने लेंडी प्रकल्पाच्या दरवाजातून पाणी सोडल्याने जवळपास १६ गावांना याचा फटका बसला होता. रावणगाव, हसनाळ या दोन गावांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि तेथील 90 टक्के घरे पूर्णतः पडली. तेलंगणासह मुखेड तालुक्यातील बारा जण या हाहाकारात मृत्युमुखी पडले.

मात्र जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, कर्नाटक सरकार, तेलंगणा सरकार यांच्यातील अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे तिकडे पोचमपाड अर्थात श्रीरामसागर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. ज्यामुळे 27ते 29 ऑगस्ट रोजी पडलेला पाऊस व त्यानंतर आलेला पूर ओसरु लागला तर निजामसागर धरणाचे १६ दरवाजे उघडल्याने लेंडी प्रकल्पाचा विसर्ग वाढला. त्यातून मुखेड, देगलूर तालुक्यात हाहाकार उडाला. एकीकडे धरण भरण्यासाठी गोदावरी नदीवरील पाणी अडविणाऱ्या बंधाऱ्याला विरोध होत होता. आता हे बंधारे पूर्ण झाले असले तरी या दोन्ही प्रकल्पाच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव या तालुक्यातील शेती मात्र पूर्णतः उद्ध्वस्त झाली.

45 गावांत पाणी

या धरणामुळेच पाण्याचा फुगवटा वाढला आणि 27 ते 29 ऑगस्ट या काळात पोचमपाड प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे गोदावरीचे पाणी धर्माबाद, नायगाव, बिलोली या तालुक्यातील जवळपास 45 गावात शिरले. त्यामुळे अनेक घरात पाणी तर शिरले, मात्र शेतीचे प्रचंड नुकसान झाले. आजही या भागातील शेती पाण्यात असून, जवळपास बाराशे लोकांना एसडीआरएफच्या पथकाने सुरक्षितस्थळी हलविले होते.

निजामसागर धरण

राज्य सीमेच्या देगलूर तालुक्यापासून दूर कामारेड्डी जिल्हयातील आचमपेठ आणि बांजेपल्ली गावामधील गोदावरी नदीची उपनदी असलेल्या मंजिरा नदीवरील हा प्रकल्प निजामसागर प्रकल्प म्हणून ओळखला जातो. तेलंगणा राज्यातील सर्वात जुने घरण 1923 साली तत्कालीन हैद्राबाद राज्याचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी बांधले होते. चाळीस गावे रिकामी करुन ते धरण बांधण्यात आले. त्यावेळी गावातील लोकांनी प्रचंड विरोध केला होता. या धरणाला 48 दरवाजे आहेत. तर धरणाची क्षमता 25.6 टीएमसी अर्थात 724.9 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. हैद्राबादच्या निजामाच्या नावावरुन त्यास ‘निजामसागर घरण’ असे नाव देण्यात आले