अवैध दारू विक्री विरोधात कारवाई, एकाच दिवशी 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्रीसंदर्भात जोरदार कारवाई केली असून, काल मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा, उमाटवाडी तसेच नांदेड तालुक्यातील वाजेगाव व पुणेगाव येथे अवैध हातभट्टी दारु अड्ड्यावर धाड टाकून 32 आरोपींना अटक करताना त्यांच्याकडील वाहने व एकूण मुद्देमाल असा 14 लक्ष 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त करुन संबंधितावर कारवाई केली आहे.

नांदेड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने लॉकडाऊनच्या काळात जवळपास 60 लक्ष रुपयांचा मुद्देमाल व दारुचा ऐवज जप्त करत असताना अनेक अवैध दारुचे अड्डे उदध्वस्त केले. काल रात्री नांदेड जिल्ह्यातील पांडूर्णा, चिकाळा तांडा ता.मुदखेड तसेच उमाटवाडी, पुणेगाव शिवार, वाजेगाव ता.नांदेड या ठिकाणी एकाचवेळी कारवाई करत 21 गुन्हे दाखल केले. राज्यात एकाच दिवशी एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होण्याची कदाचित पहिलीच वेळ असावी. या प्रकरणातील 32 आरोपी पोलिसांनी अटक केले असून, हातभट्टीची दारु 590 लिटर जप्त करण्यात आली आहे. यात वीस दुचाकी वाहने व एक चारचाकी वाहन देखील जप्त करण्यात आले असून, एकूण मुद्देमालाची वाहनासह किंमत 14 लक्ष 25 हजार रुपये एवढी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एस.खंडेराय, एस.एम. बोदमवाड, पी.ए.मुळे, टी.बी.शेख, मोहंमद रफी, अमोल शिंदे आदींनी ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने लॉकडाऊनच्या आजपर्यंतच्या काळात 60 लक्ष रुपयांची मुद्देमालासह कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.