
विजय जोशी । नांदेड
सिडकोतील शासकीय दूध विकास केंद्राने गेल्या तीन महिन्यापासून हजारो लिटर दुध खरेदी न करता परत पाठविले असल्याने संतप्त झालेल्या दूध उत्पादकांनी आज केंद्रासमोर एक हजार लीटर दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला. यावेळी दूध उत्पादकांनी शासनाचा निषेध करीत आमचे दूध घेतलेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
टेळकी येथील हजारो दूध विक्रेते सिडकोतील डेअरीमध्ये दाखल झाले. यापूर्वी सुनील हंबर्डे यांनी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकाऱ्यांना आपले दूध परत करण्यात येऊ नये, अशी विनंती करणारे अर्ज दिले होते. परंतू सिडकोतील शासकीय डेअरीच्या अधिकाऱ्यांनी आम्हास जास्त दूध घेण्यास परवानगी नाही असे सांगत दुधाची खरेदी करण्यास नकार दिला. गेल्या तीन महिन्यांपासून दररोज तीन हजार लीटर दूध हे अधिकारी परत पाठवित आहेत. यामुळे दूध उत्पादकांचे हजारो लिटर दूध वाया जात आहे. शिवाय त्यांना लाखो रुपयांचा तोटा होत आहे. तीन महिने हे सहन केल्यानंतर आज शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी दूध केंद्रासमोरच दुधाच्या कॅन पालथ्या केल्या.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने दुग्ध व्यवस्थापन अधिकारी एस.के.डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या आयुक्तांनी आम्हाला जास्त दूध न घेण्याबाबत तोंडी आदेश दिले आहेत. यासंदर्भात दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शासनाने शेतकऱ्यांकडून दूध घेऊ नका, असा कोणताही आदेश पारीत केलेला नाही. हे लक्षात घेता शासकीय दूध डेअरीच्या नांदेडच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारात हे दूध नाकारले हा प्रश्न पडतो.

























































