
भोकर तालुक्यातील प्रसिद्ध पाळज येथील गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भोकर-म्हैसा मार्गावरील नांदा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. सदर घटना तीन सप्टेंबर रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.
तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील हुमनापुर येथील भाविक दि. 3 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन क्रेटा कारने परतीच्या प्रवासाला निघाले होते. त्यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व नांदा शिवारात उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकला कारने मागून जोरात धडकली. या भीषण अपघातात कार मधील बुलीराजु चेपुरी (५५), सुनिता बुलीराजु चेपुरी (४५), वाणी सत्याबाबु (४०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक गुन्नम व्यंकटराव (४२), निलीमा रेड्डी(४३) हे दोघे गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती भोकर पोलीसांना कळताच पोलीस निरीक्षक अजित कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना तेलंगणा येथील म्हैसा रुग्णालयात उपचारासाठी वर्ग करण्यात आले.