
सामना प्रतिनिधी। नरसीफाटा
रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त मालट्रकवर भरधाव दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री नरसी ते देगलूर दरम्यान शंकरनगर जवळ असलेल्या अजनी फाट्यावर घडली आहे. साईनाथ शंकर जाधव आणि मारोती माणिक बिजलीकर अशी या दोघांची नावे आहेत.
साईनाथ रविवारी रात्री आपल्या दुचाकीने मारोती यांस अल्लापूर येथे सोडण्यासाठी जात होता. रात्री नऊच्या सुमारास शंकरनगरच्या पुढे अजनी फाट्याजवळ येताच रस्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त मालट्रकचा त्यांना अंदाज आला नाही व दुचाकी मालट्रकवर आदळली. दुचाकी वेगात असल्याने धडक बसताच दुचाकीचा चुराडा झाला. तर डोक्याला व इतर जागी जबर मार लागल्याने रक्तबंबाळ झालेले साईनाथ व माणिक हे दोघेही उडून रस्त्यावर पडले. त्यांना नायगांव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दोघानांही मृत घोषित करण्यात आले.
घटनेचे वृत्त कळताच नायगांव रुग्णालयात धाव घेतलेल्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. अतिशय जेमतेम परिस्थितीत मिळेल ते काम करुन आपल्या कुटूंबियांना हातभार लावणारे घरातील कष्टाळू युवक गमावल्याने नातलगांचा होणारा आक्रोश ह्दय हेलावणारा होता. यातील साईनाथचे नुकतेच लग्न जमले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. लग्ना अगोदरच त्याचा काळाने घात केल्याने कुटूंबावर शोककळा पसरली आहे. दोन्ही युवकांच्या मृतदेहाची नायगांव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सपोनि. अशोक जाधव यांनी दिली आहे.

































































