दहा कोटी रुपये द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक महत्वाची कार्यालये उडवून देऊ; धमकी देणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याला दहा कोटी रुपये द्यावेत, अन्यथा नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय व अन्य महत्वाची कार्यालये बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देणारा ई मेल जिल्हाधिकारी कार्यालयास आल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने अर्धापूरच्या एका युवकास अटक केली आहे.

अत्यंत गोपनियरित्या नांदेड पोलिसांनी चालविलेल्या या तपासाचा अखेर उलगडा झाला. त्याचे झाले असे की, दि.8 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई मेल आयडीवर एक मेल आला. त्यामध्ये दहा कोटी रुपये द्या नसता जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, इतर महत्वाची कार्यालय आणि संपुर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकीन असा संदेश या ईमेलमध्ये लिहिलेला होता. 125 जागी हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, अशी धमकी होती. सोबतच त्याने सर्व कार्यालयांची लिस्ट जोडली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्याबद्दल कमालीची गोपनियता बाळगण्यात आली. नांदेड पोलीस अधीक्षकांना ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने अत्यंत गोपनियरित्या पुरवून याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी तांत्रिक मदतीने हा मेल पाठविणाऱ्याची माहिती काढणाऱ्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर सोपविण्यात आली.
या पत्रामध्ये अनेक बाबी गंभीर होत्या. एक किलोमीटरपर्यंत आपल्याकडे बॉम्बची क्षमता आहे व तो परिसर मला रक्कम न मिळाल्यास उडवून टाकीन, सोबतच महत्वाची कार्यालये देखील उडवून टावूâ, अशी धमकी दिली होती.

याबाबत अत्यंत गोपनिय पध्दतीने द्वारकादास चिखलीकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बजरंग बोडके यांनी या प्रकरणी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत संपर्क साधून या मेल पाठविणाऱ्याची माहिती मिळवली. त्याचे नाव शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ रा.आगापूरा, अर्धापूर असे आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आज पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात धमकीचा मेल पाठविणाऱ्या शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ विरुध्द भारतीय दंड संहितेसह आणि भारतीय तंत्रज्ञान कायद्यानुसार वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यत सुरु होती. सदर युवकाची कसून चौकशी सध्या सुरु आहे. कोरोना संकटाच्या काळात आणखी एक नवे संकट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहिले, मात्र जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर आणि पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कुठेही हा प्रकार कळू न देता अत्यंत गोपनिय पध्दतीने या प्रकरणाची चौकशी केली आणि आरोपीला जेरबंद केले.