
सामना प्रतिनिधी । नांदेड
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण मिळाले. नांदेड-देगलूर ही बस आज आंदोलकांनी मारतळाजवळील हातनी फाटा येथे रॉकेल ओतून जाळून टाकल्याची घटना घडल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. प्रक्षुब्ध झालेल्या आंदोलकांनी नांदेड-देगलूर रस्त्यावर मारतळाजवळ हातनी फाटा येथे देगलूरकडे जाणारी बस प्रवाशांना उतरवून जाळून टाकण्यात आली. यामुळे या भागात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत सदरच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





























































