
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या सात दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. आज सकाळपासूनच मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पावडेवाडी, लिंबगाव रोड, छत्रपती चौक, मोर चौक याठिकाणी टायर जाळून तसेच पंतप्रधान मोदी यांचे असलेले पोस्टर जाळून आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. वेगवेगळ्या भागातून आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे शहरातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत शहरातील विविध रस्त्यावरुन ही रॅली काढण्यात आली. ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करुन शासनाचा निषेध करण्यात आला. आज नांदेड शहर दुपारपर्यंत कडकडीत बंद होते. सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे, नवामोंढा व अन्य बाजारपेठा बंद होत्या. ठिकठिकाणी रास्तारोको करुन आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
दरम्यान आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अंकुश कोल्हे रा.गोळेगाव ता.लोहा येथील तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच रोखले. अर्धापूर-अर्धापूर तालुक्यातील नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव महादेव, वसमत फाटा, भोकरफाटा व लोणी बु. येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अर्धापूर तालुक्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. गणपूर, मालेगाव, कामठा, लहान येळेगाव येथे मराठा समाजाचे आरक्षण मेळावे व कँडल मार्च घेण्यात आला. तसेच गावागावात आमरण उपोषणेही सुरू आहेत. संतोष गव्हाणे, प्रल्हाद इंगोले, ईश्वर पाटील, प्रमोद इंगोले, आत्तम राजेगोरे, कपिल कोंढेकर यांच्यासह अनेक जण आमरण उपोषणाला बसले आहेत. अनेक गावात अनेक समाजानी मराठा आरक्षणाला पाठींबा दिला. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली ही बातमी पसरताच सोमवारी सकाळी अचानकपणे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पिंपळगाव, भोकरफाटा, वसमत फाटा व लोणी बु. येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. हजारोंच्या संख्येने मराठा समाज आता रस्त्यावर उतरला. मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पिंपळगाव येथे गावकर्यांच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.
मुखेड-मुखेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने चार दिवसापासून साखळी उपोषण सुरु आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून राहूल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा बांधवांनी सलगरा फाटा येथे राज्य महामार्ग क्रमांक 225 वर वाहने अडवून रस्त्यावर टायर जाळून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले. यावेळी माजी नगरसेवक राहुल लोहबंदे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण मग ते कसेही, कोणत्याही कोट्यातून पण टिकणारे आरक्षण द्यावे. यावेळी सदाशिवराव पाटील, माजी नगरसेवक राहूल लोहबंदे, रामदास पाटील, गजानन मोरे पाटील, संजय पाटील वडजे बोमनाळीकर, रियाज शेख, बबलु मुल्ला, अनिल बनसोडे, सय्यद मुजीबसह कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीक्षेत्र माहूर-मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आरक्षण मागणीसाठी दि.31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता केरोळी फाटा ता. माहूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले असून आज आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली असतांना सुद्धा राज्य शासनाने दखल घेतली नसल्याने राज्य शासनाच्या निषेधार्थ केरोळी फाटा येथे सकल मराठा माहूरच्या वतीने 9.30 वाजतापासून रास्तारोको आंदोलन सुरु केले. यावेळी सुमारे दोन कि.मी.पर्यत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, सपोनी. संजय पवार यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत शासनापर्यंत आपल्या भावना कळविण्याचे सांगत समजूत काढल्याने दोन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी मराठा आरक्षण आंदोलन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले.
नायगांवबाजार-मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नायगांव तालुक्यात विविध महामार्गावर चक्काजाम तर आंदोलकांनी घुंगराळा येथे रूग्णावाहिका फोडली तर नायगांव पंचायत समितीचे शासकीय वाहन जाळण्यात आले आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याने चाळीस दिवसानंतरही कुठलीच हालचाल सरकारची दिसत नसल्याने जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात केली असून, त्यांना पाठिंबा म्हणून नायगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन 31 ऑक्टोबरच्या सकाळापासूनच तीव्र करण्यास सुरूवात केली आहे.
नांदेड ते हैदराबाद महामार्गावरील काहाळा, बरबडा फाटा, कृष्णूर, घुंगराळा, पळसगांव फाटा, देगांव फाटा, नायगांव, गडगा आदी भागात सकाळापासूनच रोडवर टायर जाळत घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र केले आहे. पुर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. घुंगराळा येथे आंदोलकांनी रूग्ण वाहिकेची तोडफोड केली. तर नायगांव पंचायत समितीचे शासकीय वाहन 30 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री मराठा आंदोलकांनी जाळण्यात आले आहे.
कंधार- तालुक्यातील विविध ग्रामीण भागात मराठा आरक्षणावर साखळी उपोषण सुरू असतानाच आज तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील कंधार, बारूळ, हाळदा, काटकळबा, वहाद, फुलवळ, पानशेवडीसह 52 गावात साखळी उपोषण सुरू आहे. गावागावात स्थानिक पातळीवर मराठा आरक्षणास पाठिंबा मिळत असताना मात्र सरकारच्या विरोधात जनमत संघटित होत आहे. उपमुख्यमंत्री फडवणीस यांना शिवीगाळ होत आहे. जाहिर झाल्याप्रमाणे आज सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. तर सकाळपासूनच सर्व उपहारगृह, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान, सराफा पुर्णतः बंद होते. केवळ डॉक्टर व मेडिकल दुकानांना यातुन सुटका दिली होती. सकाळी दहा वाजता आंदोलनकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार निषेधाचे नारेबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये विजय धोंडगे, पुरूषोत्तम धोंडगे, शहाजी नळगे, मारोती पांढरे, सतीश नळगे, अजय मोरे, आकाश कल्याणकर, नितीन कोकाटे, कैलास जाधव, रमा पाटील जोगदंड, केशव पाटील जाधव, गजानन कांगणे, संभाजी गारोळे, गणेश मोरे, मनोज नळगे यांच्यासह अनेक मराठा आंदोलक उपस्थित होते.
मारतळा- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मारतळा व परिसरात मोठा पाठिंबा मिळत असून आज मारतळासह अनेक गावांमध्ये कडकडीत बंद ठेऊन मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करून सकल मराठा समाजाकडून शासनाच्या वेळकाढू धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. काही गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तर काही गावांमध्ये पुन्हा एकदा तिघाडी शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यात सर्व समाजातील महिला व पुरूषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
आज सकाळपासूनच मंगळवार हा आठवडी बाजारचा दिवस असताना मारतळा येथे स्वंयस्फूर्तीने व्यापारी मंडळींनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर सकल मराठा समाजाकडून मारतळा येथे नांदेड-हैद्राबाद राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. मारतळासह या परिसरातील कौठा फाटा, कापसी बु. गोळेगाव, हिन्दोळा, पिंपळदरी, उमरा खांडी या ठिकाणी येथील गावकर्यांनी शांततापूर्ण मार्गाने चक्काजाम आंदोलन केले. या गावकर्यांनी रस्त्यावर झाडे तोडून टाकली तसेच रोडवर मोठे- मोठे दगड टाकून व टायर जाळून चक्काजाम आंदोलन केले.
हिमायतनगर-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरावली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथील सकल मराठा बांधवांकडून एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात आले. तालुक्यातील बहुतांश गावामध्ये राजकीय नेत्यांनी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत प्रवेश करू नये असे समाज बांधवांकडून सांगण्यात आले आहे. गावबंदी दरम्यान जर राजकीय नेत्यांनी शहरासह तालुक्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर गंभीर परिणामाना सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा समाज बांधवाकडून देण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर येथे साखळी उपोषण सुरू केले. तसेच उद्या दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाज बांधव हिमायतनगर तालुका एक दिवसाचे बाजारपेठ बंद पुकारण्यात आला आहे.



























































