
नांदेड लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्ठवाडीत संत बाळूमामांच्या सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमातील भगर व आमटीच्या महाप्रसादातून दीड ते दोन हजार भक्तांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ही घटना घडली. विषबाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना नांदेडच्या शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरा झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून सर्व रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेडच्या लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे दोन दिवसांपासून संत बाळू मामा यांचा सप्ताह सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. मंगळवार एकादशीनिमित्त दर्शनसाठी गर्दी होती. एकादशीच्या निमित्तानं भगर व आमटीचा महाप्रसाद होता. मात्र या प्रसादातून दीड ते दोन हजार भक्तांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधा झालेल्याना मळमळ, उलट्या होऊ लागल्याने भाविकांना लोहा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णांची संख्यावाढत असल्याने एसटीसह खाजगी वाहनाने अहमदपूर, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात देखील रूग्णांना उपचाराठी भरती करण्यात आले आहे. त्यामुळे रूग्णालयात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. रुग्णांमध्ये सावरगाव, कोष्ठवाडी, हरणवाडी, रिसनगाव, पेंडू, मुरंबी आदी गावातील भाविकांचा समावेश आहे. सध्या विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वांना उपचार प्रकिया चालु असुन पोलिस निरीक्षक अधिक्षक, नायब तहसीलदार, असंख्य अधिकारी व कर्मचारी यांचे अथक प्रयत्न चालू आहेत.
महाप्रसाद कार्यक्रमातील अन्नातून विषबाधा झाल्याची घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्वतः उपस्थित राहून विषबाधा झालेल्या नागरिकांवर उपचारासाठी नियोजन केले. तसेच सर्व रूग्णांना उपचार चालू आहे, वाहने पण उपलब्ध आहेत, सरकारी दवाखान्यासह औषध पुरवठा पण उपलब्ध आहे. सध्या शांतता आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही अशी माहिती लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली आहे.


























































