नांदेडमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। नांदेड

नांदेड – हैद्राबाद रस्त्यावरील नेकलेस रोडवर रविवारी सकाळी स्थानिक गुन्हा शाखेने गुटखा भरलेला एक ट्रक पकडला आहे. या ट्रकसह पकडलेल्या मुद्देमालाची किंमत 25 लाख 36 हजार रुपये आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना गुटख्याच्या ट्रकबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक नेकलेस रोड येथे पोहचले. रात्री १च्या सुमारास त्यांना ट्रक क्रमांक एम एच 31 जी 6599 दिसला. त्यानंतर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात अनेक प्रकारचे प्रतिबंधित गुटख्याच्या 30 पिशव्या मिळाल्या. त्यात गुटखा भरलेला होता. दरम्यान,पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालकासह सर्वजणांनी तिथून पळ काढला. हा गुटखा कोणी कोणासाठी पाठवला. याचा शोध पोलीस घेत आहेत.

याबाबत अन्न व सुरक्षा विभागाचे निरीक्षक उमेश रामराव कावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक आणि गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला आहे. यासर्व ऐवजाची किंमत 25 लाख 36 हजार रुपये असल्याची नोंद पोलीस प्राथमिकी मध्ये आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्याकडे देण्यात आला आहे.