ऑफिसला घोडय़ावरून यायचंय, त्याला बांधण्यासाठी परवानगी द्या!

सोशल मीडियावर एक पत्र सध्या व्हायरल होतेय. पत्रामध्ये सतीश देशमुख या कर्मचाऱ्याने घोडय़ावरून ऑफिसला येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच घोडा बांधण्यासाठी ऑफिसच्या परिसरात परवानगी मागितली आहे.

देशमुख हे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो विभागात सहायक लेखाधिकारी आहेत. आपल्याला पाठीच्या मणक्याचा त्रास होत असून वाहनातून कार्यालयात येण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. परिणामी घोडय़ावर बसून कार्यालयात येण्याची तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्डे यामुळे वाहनातून येण्यास होत असलेल्या त्रासाची पैफियत त्यांनी मांडली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना  रीतसर अर्ज सादर केला आहे. पत्राला पोहोच देण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

वरिष्ठांचे मजेशीर उत्तर असे असेल

आगळ्यावेगळ्या पत्रामुळे सोशल मीडियावर चर्चेला जोर आला आहे. या पत्राला वरिष्ठांचे उत्तर काय असेल याबाबत गमतीशीर मेसेज व्हायरल होत आहेत. घोडा खरेदी करण्यासाठी डिपार्टमेंटची परवानगी घेतली होती का? घोडा हाच प्राणी खरेदी करण्याचे प्रयोजन काय? घोडा हाताळण्यासाठी आपण प्रशिक्षण घेतले आहे का? घेतले असल्यास दाखला सोबत जोडावा. घोडा उधळल्यास जबाबदारी कोणाची असे मजेशीर प्रश्नांचे मेसेज सोशल मीडियावरून फॉरवर्ड होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या