
जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी पहलगाम हल्यात सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली हे मान्य केले. असे असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कडक सुरक्षा व्यवस्था असताना त्याठिकाणी आतंकवादी पोहचले कसे? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला केला असून याला जबाबदार कोण? असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे.
एका न्यायालयीन प्रकरणात वॉरंट आल्याने असदुद्दीन ओवेसी हे बुधवारी (16 जून 2025) सकाळी नांदेडला आले होते. परवानगी शिवाय सभा घेतल्याबद्दल निवडणुकीत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर वॉरंट जारी करण्यात आले होते. आज न्यायालयात हजर राहून त्यांनी जामीन मिळवला. यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, कश्मीरमध्ये पहलगामला झालेला हल्ला संतापजनक असून सुरक्षा व्यवस्था असताना आतंकवादी तेथे पोहचले कसे, असा प्रश्न त्यांनी विचारला. बिहार राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचे नागरिकत्व तपासण्याची मोहिम सुरू झाली असून ही बाब संतापजनक आहे. यासाठी दिलेला अवधी अत्यंत कमी असून अन्य राज्यात काम करणार्यांना, बिहारी बांधवाना त्यासाठी वेळ दिला पाहिजे. अमरनाथ यात्रा सुरू झाली असून कुठल्याही दुर्घटनेशिवाय पूर्ण व्हावी. ही यात्रा निर्विघ्न पार पडावी अशी भावना, त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. युवकांना महाराष्ट्र सरकार रोजगार देवू शकत नाही, लाडक्या बहिण योजनेचा बट्याबोळ झाला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार व त्यांचे नेते एका विशिष्ट समुदायाविरूद्ध बोलून दिशाभुल करत आहेत, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केला.